इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021मध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करून सर्वांची मने जिंकणारा रवींद्र जडेजावर चारही बाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. बर्‍याच माजी क्रिकेटपटूंनी जडेजाला जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हटले आहे. याविषयी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर, त्याने जडेजाचे आपला आवडता परदेशी खेळाडू म्हणून वर्णन केले आहे.

मायकेल वॉन आपल्या ट्विटरवर म्हणाला, ”सध्या गेम खेळत असलेल्या सर्व खेळाडूंपैकी अनेक महान खेळाडू आहेत, पण माझा आवडता परदेशी खेळाडू रवींद्र जडेजा आहे. बीसीसीआय, चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या आस पास असणारी एक टीम तयार केली पाहिजे.” बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसंबधी केंद्रीय करारांची घोषणा केली. यात जडेजा ए विभागात आहे. यावरून वॉनने बीसीसीआयवर टीका केली होती. जडेजासारखा खेळाडू ए+ विभागात हवा होता, असे त्याने सांगितले.

 

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने केएल राहुलला शानदार पद्धतीने धावबाद केले. याशिवाय, त्याने दीपक चहरच्या गोलंदाजीवर आक्रमक ख्रिस गेलचा अफलातून झेलही टिपला. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर जडेजा आयपीएल 2021च्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात परतला आहे.

केएल राहुल आणि ख्रिस गेलची विकेट गमावल्यानंतर पंजाब किंग्जचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. त्यांना 20 षटकांत केवळ 106 धावाच करता आल्या. चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरने चार षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 13 धावा देऊन चार बळी घेतले. 107 धावांचे लक्ष्य चेन्नईने 15.4 षटकांत 4 गडी गमावून गाठले. सीएसकेकडून मोईन अलीने 47 आणि फाफ डु प्लेसीसने नाबाद 36 धावा केल्या.