Mitchell Johnson Statement On Josh Hazlewood: गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. तर कर्णधार तेंबा बावूमाने ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉनसनने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडवर जोरदार टीका केली आहे.
मिचेल जॉनसनच्या मते, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने आयपीएलला अधिक प्राधान्य दिलं. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाचं वातावरण पाहता, बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत बरेच खेळाडू मायदेशी परतले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील सामने खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला होता. ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी देखील आयपीएलचे उर्वरीत सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा जोश हेजलवूड भारतात परतला.
लॉर्ड्सच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. पण या सामन्यात अनुभवी गोलंदाज जोश हेजलवूडला केवळ २ गडी बाद करता आले. त्यामुळे मिचेल जॉनसनने हेजलवूडवर जोरदार टीका केली आहे. मिचेल जॉनसनने द वेस्ट ऑस्ट्रेलियनच्या कॉलममध्ये लिहिले, “गेल्या काही वर्षांपासून जोश हेजलवूडच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सराव करणं सोडून आयपीएल खेळण्यासाठी जाणं हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा होता.”
तसेच त्याने पुढे लिहिले की, “जर संघातील अनुभवी खेळाडू अॅशेस मालिकेला फेअरवेल मालिका समजून संघात टिकून आहेत. तर ही मानसिकता योग्य आहे का? याची विचार करण्याची गरज आहे. आता भविष्याचा विचार करायला हवा आणि युवा खेळाडूंना आत्मविश्वासाने संधी द्यायला हवी.” जोश हेजलवूडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने या डावात गोलंदाजी करताना २२ गडी बाद केले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.