चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या विजयात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू मिचेल स्टार्क हल्लीच टी-२० क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. स्टार्कच्या टी-२० मधील निवृत्तीची अचानक घोषणा पाहताच चाहतेही अवाक् झाले. टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर स्टार्कने या निर्णयावर भाष्य केलं आहे. दरम्यान त्याने आता निवृत्तीनंतर मिचेल मार्शची माफी मागितली आहे.
२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने एकमेव टी२० विश्वचषक जिंकला. मिचेल स्टार्क विश्वविजेत्या संघाचा भाग होता. आता मिचेल स्टार्क फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. मुलाखतीदरम्यान स्टार्कने त्याच्या भविष्यातील योजनांबद्दलही मोकळेपणाने सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या निवृत्तीची बातमी पाहून ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा कर्णधार मिचेल मार्शला धक्का बसला होता. स्टार्कने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान याबाबत वक्तव्य केलं. स्टार्कने त्याच्या टी-२० क्रिकेटमधील निवृत्तीबाबत संघातील कोणालाच सांगितलं नव्हतं.
मिचेल स्टार्क टी-20 निवृत्तीनंतर काय म्हणाला?
स्टार्क मार्शबद्दल सांगताना म्हणाला, “मी कदाचित मिशेल मार्शला फोन करायला हवा होता. त्याने मला मेसेज केला आणि सांगितलं की त्याला माझ्या निवृत्तीबाबत इन्स्टाग्रामवरून कळलं. मला हे ऐकून नंतर वाईट वाटलं. मी कर्णधाराला तरी सांगायला हवं होतं. मी त्याची माफी मागतो.”
स्टार्कने कोच आणि सपोर्ट स्टाफबद्दल सांगताना म्हटलं, “मी त्यांना फक्त सांगितलं, विचारलं नाही. रॉनीशी (अँड्र्यू मॅक्डोनाल्ड) बोललो आणि मग त्या दोघांना सांगितलं की मी हा प्रवास थांबवतोय. एवढंच होतं.”
ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वीच स्टार्कने निवृत्तीची घोषणा केली. कॅमेरून ग्रीन शेफील्ड शील्ड क्रेकिट सामने खेळत असल्याने संघाबाहेर झाला. तर नॅथन एलिस वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर राहिला. मॅट शॉर्ट, मिचेल ओवन आणि मार्कर्स स्टॉयनिस यांनी संघात संधी देण्यात आली.
मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटला कायमचं प्रथम प्राधान्य दिलं आहे. त्याचबरोबर आगामी २०२७चा वनडे वर्ल्डकप लक्षात घेता स्टार्कला वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आहे. स्टार्क म्हणाला की, त्याला तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकायचा आहे. स्टार्क २०१५ आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. यामध्ये स्टार्कने खूप चांगली कामगिरी केली.
स्टार्क जर दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवू शकला तर तो विश्वचषकातील सर्वकालीन महान एकदिवसीय गोलंदाजाचा किताब आपल्या नावे करू शकतो. या बाबतीत, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा अव्वल स्थानावर आहे. त्याने १९९६, १९९९, २००३ आणि २००७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात भाग घेतला. यादरम्यान मॅकग्राने ७१ विकेट्स घेतल्या.