न्यूयॉर्क : वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा अशी ख्याती असलेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेने या वर्षीपासून नवा पायंडा पाडला असून, एकेरीच्या स्पर्धेच्या जवळपास आठवडाभराआधीच मिश्र दुहेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे. मिश्र दुहेरीच्या दोनदिवसीय स्पर्धेला आज, मंगळवारपासून सुरुवात होणार असून यात नामांकित खेळाडूंच्या सहभागाचे आकर्षण असेल.

या स्पर्धेत आठ जोड्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. यात पुरुष एकेरीतील अग्रमानांकित यानिक सिन्नेर आणि कॅटेरिना सिनियाकोवा यांचाही समावेश आहे. कार्लोस अल्कराझ एमा रॅडुकानुसह खेळणार असून, पहिल्या फेरीत त्यांची गाठ अग्रमानांकित जेसिका पेगुला आणि जॅक ड्रॅपर या जोडीशी पडणार आहे. त्याच वेळी सिन्नेर-सिनियाकोवा पहिल्या फेरीत ॲलेक्झांडर झ्वेरेव आणि बेलिंडा बेंचिच जोडीविरुद्ध खेळणार आहे. नोव्हाक जोकोविच आणि ओल्गा डॅनिलोविच जोडीसमोर डॅनिल मेदवेदेव आणि मीरा आंद्रिवा जोडीचे आव्हान असेल.

एकेरीतील बहुतेक आघाडीचे खेळाडू या वेळी मिश्र दुहेरीत खेळणार आहेत. अमेरिकन स्पर्धेतील दोन वेळची विजेती नाओमी ओसाकला गेल मोंफिस, कॅरोलिना मुचोवाला आंद्रे रुब्लेव आणि लॉरेन्झो मुसेट्टीला केटी मॅकनॅलीची साथ लाभेल. मुसेट्टी जॅस्मिना पाओलिनीच्या साथीत खेळणार होता. मात्र, ती सिनसिनाटी स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने तिने अमेरिकन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतून माघार घेतली. मात्र, सिनसिनाटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील तिची प्रतिस्पर्धी इगा श्वीऑटेक कॅस्पर रुडच्या साथीत खेळणार आहे. मिश्र दुहेरीतल गतविजेती सारा एरानी आणि आंद्रेया वावासोरी जोडीही स्पर्धेत सहभाग नोंदवेल.

वेळापत्रकात बदल कशासाठी?

अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीची स्वतंत्र स्पर्धा खेळविण्याच्या निर्णयाने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. आयोजकांच्या या निर्णयावर खेळाडूंमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकेरीतील अव्वल खेळाडूंना मिश्र दुहेरीच्या लढती खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, गतविजेत्या सारा एरानी आणि आंद्रेया वावासोरी जोडीने या निर्णयावर टीका केली आहे. हा बदल अन्यायकारक असून, केवळ नफ्यासाठी असा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्याच वेळी आघाडीचा खेळाडू जॅक ड्रॅपर याने एकेरीच्या तयारीसाठी मिश्र दुहेरीत दुसऱ्या अव्वल खेळाडूबरोबर खेळणे फायदेशीर ठरेल असे मत मांडले.

स्पर्धेचे स्वरूप…

मिश्र दुहेरीची स्पर्धा केवळ दोन दिवस चालणार असून यात एकूण १६ जोड्यांचा सहभाग आहे. या स्पर्धेला आज, मंगळवारपासून सुरुवात होईल. पहिल्या दिवशी दोन फेऱ्या होतील. त्यानंतर बुधवारी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उपांत्य आणि अंतिम लढत खेळवली जाईल. अंतिम लढतीव्यतिरिक्त सर्व फेऱ्यांत एक सेट केवळ चार गुणांचा असेल. तसेच लढत तिसऱ्या सेटमध्ये गेल्यास थेट ‘टायब्रेकर’ होईल आणि यात प्रथम १० गुण मिळवणारी जोडी विजेती ठरेल. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी जोडी १० लाख डॉलरचे (साधारण ८ कोटी ७४ लाख रुपये) बक्षीस मिळवेल.