इंग्लंडचा संघ लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी ३८७ धावा करत सर्वबाद झाला. मोहम्मद सिराजने ब्रायडन कार्सला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा डाव संपवला. इंग्लंडकडून या सामन्यात जो रूटने शतक केले. तर त्याशिवाय जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकं झळकावली. सिराजने स्मिथची विकेट घेतल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन आता व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहला लॉर्ड्स कसोटी सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं. बुमराहने या कसोटीच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेतले. तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतले. मोहम्मद सिराजने दुसरं सत्र होताच भारताला मोठी विकेट मिळवून दिली.
मोहम्मद सिराजने लंचब्रेकनंतर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जेमी स्मिथला झेलबाद केलं. जेमी स्मिथ सिराजने टाकलेला चेंडू खेळायला गेला, पण चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला आणि त्याने चांगला झेल टिपला. स्मिथ ५६ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावा करत बाद झाला. त्याला बाद केल्यानंतर सिराज फिरला आणि त्याने २० आकडा दाखवत मैदानाकडे बोट केलं. त्याच्या या सेलिब्रेशनचा अर्थ काय असा प्रश्न सर्वांना पडला.
मोहम्मद सिराजने लंचब्रेकनंतर जेमी स्मिथची विकेट घेतल्यानंतर २० आकडा दाखवत सेलिब्रेशन केलं आणि आभाळाकडे हात दाखवला. सिराजच्या या सेलिब्रेशनचा अर्थ म्हणजे त्याने ही विकेट पोर्तुगीज फुटबॉलर डियोगो जोटा याला समर्पित केली. जो कार अपघातात मृत्यू पावला
अलिकडेच, लिव्हरपूलकडून फुटबॉलपटू डिओगो जोटा याचे रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाले. तेव्हापासून, सर्व खेळाडू त्याला आपआपल्या खेळातून अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली वाहत आहेत. मोहम्मद सिराजनेही त्याला आपण घेतलेली विकेट समर्पिते केली. यामुळे मोहम्मद सिराजचं कौतुक केलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या या नवीन सेलिब्रेशनचे सर्वजण कौतुक करत आहेत. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सिराजने ८५ धावा देत २ बळी घेतले.
मोहम्मद सिराजच्या २ विकेट्ससह अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही ५ विकेट्स घेतल्या. नितीश कुमार रेड्डीने २ विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजानेही १ विकेट घेतली. पहिल्या डावात इंग्लिश संघाने ११२.३ षटकांत ३८७ धावा केल्या.