Mohammed Siraj on India vs England 3rd Test : लॉर्डसच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत व इंग्लंड संघांमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला. या सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा खिंड लढवत होता. त्याचवेळी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज हे जडेजाच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उभे होते. बुमराह तब्बल १०० मिनिटे मैदानावर उभा राहिला तर, सिराज देखील एक तास किल्ला लढवत होता. परंतु, दोघे भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

भारतीय संघाला २२ धावांची आवश्यकता असताना इंग्लंडकडून ७५ वे षटक टाकण्यासाठी शोएब बशीर गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे २ चेंडू खेळल्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर जडेजाने १ धाव घेतली आणि स्ट्राइक मोहम्मद सिराजला दिला. सिराजला या षटकातील ३ चेंडू खेळून काढायचे होते. या षटकातील पाचव्या चेंडूवर सिराजने बचाव केला. त्यानंतरही चेंडू वेग व हवेमुळे यष्टीवर जाऊन आदळला. त्यामुळे सिराज त्रिफळाचित झाला. सिराजने ३० चेंडू खेळून ४ धावा जमवल्या.

सिराजची भावनिक पोस्ट

बाद झाल्यानंतर सिराज स्वतःवर नाराज होता. पराभवानंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. दरम्यान, या पराभवानंतर सिराज पहिल्यांदाच सर्वांसमोर व्यक्त झाला आहे. त्याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही देखील भावूक व्हाल.

मोहम्मद सिराजने काय म्हटलंय?

सिराजने या पोस्टमध्ये लॉर्ड्स कसोटी सामन्यातील शेवटच्या काही क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. यासह कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे की “काही सामन्यांच्या आठवणी कायम तुमच्याबरोबर राहतात. त्या सामन्यांच्या निकालामुळे नव्हे तर त्यातून तुम्ही काय शिकता यासाठी ते सामने तुमच्याबरोबर राहतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जडेजा, बुमराह व सिराजची झुंज अपयशी

भारताने लॉर्डसवरील सामना गमावला असला तरीदेखील सिराज, जडेजा आणि बुमराहने फलंदाजीत दिलेलं योगदान कोणीच विसरू शकणार नाही. बुमराह १०० मिनिटं खेळपट्टीवर टिकून होता, जडेजा शेवटपर्यंत लढला. सिराजच्या खांद्याला चेंडू लागूनही तो पुन्हा फलंदाजीला आला. त्यानंतरही त्याने काही चेंडू खेळून काढले.