विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर सर्व सहकारी त्याच्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त झाले. अनेकांनी ट्वीट करत विराटसाठी आपली मते दिली. यात आता भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही समावेश झाला आहे. सिराजने विराटसाठी भावनिक पोस्ट लिहिली. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील, असे सिराजने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले. सिराजच्या या पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
गेल्या वर्षी टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून वगळण्यात आले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळीच विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्याने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला.
हेही वाचा – ‘‘माझ्या मते हे…”, विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानच्या आफ्रिदीनं दिली मोठी प्रतिक्रिया!
मोहम्मद सिराजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीसोबत भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना काही फोटो शेअर केले आणि विश्वास दाखवल्याबद्दल विराट कोहलीचे आभारही मानले. ”माझ्या सुपरहिरोसाठी, तुझ्याकडून मिळालेले समर्थन आणि प्रोत्साहन याबद्दल मी कितीही आभार मानले, ते कमीच असतील. तू माझ्यासाठी नेहमीच मोठा भाऊ आहेस, इतक्या वर्षात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या वाईट काळातही तू माझ्यात चांगले पाहिलेस. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील”, असे सिराजने म्हटले.
मोहम्मद सिराजच्या कारकिर्दीवत विराटचा मोठा वाटा आहे. विराटने सिराजला आयपीएलमध्ये आरसीबीकडून वारंवार संधी दिली आणि त्याची पाठराखण केली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी त्याला प्रोत्साहनही दिले. कोहलीनेही सिराजच्या क्षमतेचे कौतुक केले आहे.