scorecardresearch

‘‘माझ्या मते हे…”, विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानच्या आफ्रिदीनं दिली मोठी प्रतिक्रिया!

विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

Shahid afridi made a big statement after virat kohli quit test captaincy
शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहली

१५ जानेवारी रोजी विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून त्याच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कोहलीच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचीही प्रतिक्रिया आली आहे. आफ्रिदीने विराटच्या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, ”कोहली खूप क्रिकेट खेळला आहे आणि त्याला काय बरोबर आणि काय चूक हे माहीत आहे.”

शनिवारी विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने हा निर्णय घेतला. आफ्रिदीचा असा विश्वास आहे, की अशी वेळ येते जेव्हा दबाव हाताळणे कठीण असते. आफ्रिदी म्हणाला, ”माझ्या मते हे बरोबर आहे. विराटने भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि संघाचे चांगले नेतृत्व केले आहे. आणि माझा विश्वास आहे की तो योग्य निर्णय आहे. एक असा टप्पा येतो जिथे तुम्ही दबाव हाताळू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या कामगिरीला फटका बसतो. त्यामुळे मला वाटते की त्याने दीर्घकाळ आणि मोठ्या स्तरावर कर्णधारपद भूषवले आहे. एक फलंदाज म्हणून क्रिकेटचा आनंद घेण्याची हीच वेळ आहे.”

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक संपल्यानंतर कोहलीने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. निवड समितीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगळे कर्णधार नको होते. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. घरी परतल्यानंतर कसोटी संघाच्या कर्णधाराची घोषणा होऊ शकते.

हेही वाचा – ‘‘विराट भावा तू खरा…”, कोहलीसाठी भावूक झाला पाकिस्तानचा मोहम्मद आमिर; एका ट्वीटनं जिंकली लाखोंची मनं!

विराट कोहलीने ४० कसोटी विजयांसह भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवली. त्याचबरोबर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. ग्रॅमी स्मिथ (५३), रिकी पाँटिंग (४८) आणि स्टीव्ह वॉ (४१) हे दिग्गज क्रिकेटपटू त्याच्या पुढे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid afridi made a big statement after virat kohli quit test captaincy adn