India vs England 5th Test: ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पार पाडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ६ धावा दूर राहिला. यासह हा सामना भारतीय संघाने जिंकून मालिका बरोबरीत आणली. या सामन्यातील पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज या सामन्याचा शिल्पकार ठरला. या सामन्यानंतर त्याने वर्कलोड मॅनेजमेंटबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
जसप्रीत बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार हे आधीपासून ठरलं होतं. त्यामुळे त्यामुळे कुठल्यातरी २ सामन्यात वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या हाती असेल याची कल्पना सिराजला आधीपासून होती. ज्या २ सामन्यात त्याला ही जबाबदारी मिळाली, त्या दोन्ही सामन्यात त्याने भारतीय संघासाठी दमदार गोलंदाजी केली. या मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. ज्याने जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवू दिली नाही.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला एका पत्रकाराने विचारलं, “तू या मालिकेत खूप जास्त गोलंदाजी केली आहेस. तू फिट आहेस ना? तू किती थकलायस? आणि स्वतःला कामासाठी प्रेरित करणं किती कठीण होतं?” या प्रश्नाच उत्तर देताना सिराज हसला आणि म्हणाला, “मी आता पूर्णपणे ठीक आहे. मी या मालिकेत जवळपास १८७ षटकं टाकली आहेत. पण जेव्हा देशाचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा देशासाठी सर्वकाही देणं हाच प्रयत्न असतो. त्यावेळी फार विचार करायचा नसतो. मी सहावं षटक टाकतोय की नववं, असा कुठल्याही विचार मनात येत नाही. मला स्वत:वर पूर्ण विश्वास आहे. मी प्रत्येक चेंडू हा स्वत:साठी नव्हे, तर देशासाठी टाकतो.”
सिराज- प्रसिधची जोडी चमकली
या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी दमदार गोलंदाजी केली. सिराजने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. तर प्रसिधने ४ गडी बाद केले. दोघांनी मिळून दुसऱ्या डावात ९ गडी बाद केले. तर आकाशदीपने १ गडी बाद केला. यासह भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.