India vs England 5th Test: ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल स्टाईल फलंदाजी केली. पहिल्या षटकापासून इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. इंग्लंडच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची जोडी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत इंग्लंडच्या फलंदाजांना ३ मोठे धक्के दिले.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने दमदार सुरूवात केली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९२ धावा जोडल्या. जॅक क्रॉलीने डावाची सुरूवात करताना ५७ चेंडूंचा सामना करत ६४ धावांची खेळी केली. तर बेन डकेट ३८ चेंडूत ४३ धावांवर माघारी परतला. दरम्यान ओली पोपला बाद करण्यासाठी मोहम्मद सिराजने भन्नाट इन स्विंगर चेंडू टाकला.

मोहम्मद सिराज या डावाच्या सुरूवातीला गोलंदाजीत संघर्ष करत होता. पण त्यानंतर त्याने अचूक लाईन लेंथवर चेंडू टाकला आणि पोपला बाद करत माघारी धाडलं. तर झाले असे की, ओली पोप २२ धावांवर फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराज २५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडताच वेगाने आत आला आणि पोपच्या पॅडला जाऊन लागला. सिराजने चेंडू पॅडला लागताच जोरदार अपील केली. पण पंचांनी ही अपील फेटाळून लावली.

पंचांनी अपील फेटाळल्यानंतर, सिराजने डिआरएसची मागणी केली. ध्रुव जुरेलला वाटलं होतं की, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाईल. त्यामुळे तो डिआरएस घेवू नकोस असं म्हणत होता. शेवटचा १ सेंकद शिल्लक असताना त्याने डिआरएसचा इशारा केला आणि डिआरएसमध्ये दिसून आलं की, चेंडू लेग स्टंपला जाऊन लागतोय. त्यामुळे पोपला बाद होऊन माघारी परतावं लागलं. पोपला बाद केल्यानंतर सिराजने इंग्लंडला आणखी एक दणका दिला. सिराजने भन्नाट वेगवान चेंडू टाकून जो रूटलाही बाद करून माघारी धाडलं. रूट ४५ चेंडूंचा सामना करत २९ धावांवर माघारी परतला.