Mohsin Naqvi vs Moonis Elahi on PCB President : आशिया चषक स्पर्धा २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करत भारताने विक्रमी ९ व्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र, या विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला. तर, नक्वी यांनी देखील मुजोरपणा दाखवत चषक घेऊन मैदानातून पलायन केलं. तसेच त्यांनी आता भारतीय संघाला आव्हान दिलं आहे की “तुम्ही आशिया चषक स्पर्धा जिंकली असेल तर चषक दाखवा.”
नक्वी यांच्या या उद्दामपणाविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानातूनही नक्वी यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. ही मागणी भारताच्या समर्थनात नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंतर्गत कलहांमुळे होत आहे.
विरोधी पक्ष नक्वींविरोधात आक्रमक
मोहसीन नक्वी यांची पीसीबीच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाकिस्तानी जनता व क्रिकेटरसिकांकडून ही मागणी होत आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांची ही मागणी मांडली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे वरिष्ठ नेते मूनिस इलाही यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट करत नक्वी यांच्यावर टीका केली आहे.
मूनिस इलाही यांचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चिमटा
मूनिस इलाही म्हणाले, “या ‘निवडून आलेल्या’ पंतप्रधानांमध्ये म्हणजेच शाहबाज शरीफ यांच्यात थोडी जरी हिंमत असेल तर त्यांनी मोहसीन नक्वी यांच्याविरोधात कारवाई करायला हवी. नक्वी यांनी खूपच कमी कालावधीत पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड धुळीस मिळवलं आहे. नक्वी यांची हकालपट्टी गरजेची आहे.”
नक्वी यांच्या हकालपट्टीची मागणी
“या निर्लज्ज माणसाला कसलाही पश्चाताप नाही. त्याने काय करून ठेवलंय त्यालाही कल्पना नसेल. ज्या लोकांनी नक्वी यांची पीसीबीच्या प्रमुखपदी नियुक्त केली आहे. त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. खरंतर नक्वी यांची पीसीबीच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करायला हवी.”
“भारताबरोबर हरण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना संघातून डच्चू दिला”
दरम्यान, सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद जुबैर यांनी देखील नक्वी यांच्यावर टीका केली आहे. नक्वी यांच्यावर निशाणा साधत जुबैर म्हणाले, “नक्वी यांनी पाकिस्तानी संघाची वाट लावली आहे. संघातील वरिष्ठ, अनुभवी व गुणी खेळाडूंची संघातून हकालपट्टी केली आहे. आपला कट्टर शत्रू असलेल्या भारताकडून पराभव व्हावा म्हणूनच नक्वी यांनी संघातील चांगल्या खेळाडूंना बाजूला केलं आहे.”