ब्राझीलचे ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्याची संधी मोहन बागानच्या खेळाडूंना मिळणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी ते भारतात येणार असून, फुटबॉल चाहत्यांना त्यांचे अनुभव ऐकण्याचा योग येणार आहे.
पेले हे १९७७मध्ये येथील मित्रत्वाच्या सामन्यात सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रथमच भारतास भेट देणार आहेत. ईडन गार्डन्स स्टेडियमवर मोहन बागानविरुद्ध झालेल्या प्रदर्शनीय लढतीत न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबकडून पेले यांनी भाग घेतला होता. मोहन बागान संघाचे नेतृत्व सुब्रत भट्टाचार्य यांनी केले होते. हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. त्या वेळी या सामन्याचा आनंद ८० हजार प्रेक्षकांनी घेतला होता. या सामन्यात सहभागी झालेल्या मोहन बागान संघातील खेळाडूंचा पेले यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. तसेच ते ईडन गार्डन्स मैदानासही भेट देणार आहेत. पेले यांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी १२ ऑक्टोबर रोजी नेताजी इनडोअर स्टेडियमवर एक कार्यक्रम आयोजित केला असूून, त्याला पेले यांच्याबरोबरच फुटबॉल क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. १३ ऑक्टोबर रोजी विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर होणाऱ्या अ‍ॅटेलटिको कोलकाता संघाच्या पहिल्या सामन्यास ते उपस्थित राहणार आहेत.
पेले हे तीन दिवसांच्या भेटीनंतर येथून नवी दिल्ली येथे जाणार आहेत. आगामी भेटीबाबत पेले यांनी सांगितले, ‘‘मी पुन्हा भारतभेटीला उत्सुक आहे. माझ्या भेटीच्या वेळी दुर्गा महोत्सव होणार असून त्याचा आनंदही मला घेता येणार आहे.’’