कोलकाता : पुढील महिन्यात होणाऱ्या ‘सीएएफए नेशन्स चषक’ फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेले राष्ट्रीय संघाचे शिबीर संकटात आले आहे. संभाव्य संघातील ३५ पैकी १३ खेळाडूंनी शिबिरात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोहन बागान क्लबच्या सात खेळाडूंचा समावेश असून, त्यांना क्लबनेच सोडण्यास नकार दिला आहे.
खेळाडूंच्या स्वास्थ्याविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) निष्काळजी असून, त्यांना खेळाडूंची चिंता नसल्याची टीकाही मोहन बागान क्लबच्या व्यवस्थापनाने केली आहे. ड्युरँड चषक स्पर्धा सुरू असल्यामुळे खेळाडू शिबिरात दाखल झाले नाहीत असे मानण्यात येत होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालकडून १-२ असे पराभूत झाल्यानंतरही मोहन बागान क्लबने आपल्या खेळाडूंना शिबिरात दाखल होण्यास मनाई केली आहे.
‘‘शिखर संघटनेच्या (फिफा) कार्यक्रमाबाहेरील स्पर्धेसाठी खेळाडूंना मुक्त करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. प्रत्येक वेळेस आमच्या खेळाडूंची निवड होते आणि त्यातील एक-दोन जण जायबंदी होतात. पुढे त्यांच्या पुनर्वसनाकडे ‘एआयएफएफ’चे लक्षच नसते,’’ असे बागानच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. या वेळी त्यांनी सुभाशीष बोसचे उदाहरण दिले. ‘‘बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सुभाशीष जायबंदी झाला. संपूर्ण हंगामास तो मुकला. आम्ही त्याला वेतन देत आहोत. मात्र, ‘एआयएफएफ’ने साधी विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही,’’ असे हा अधिकारी म्हणाला.
मोहन बागान क्लबने २३ वर्षांखालील आशिया चषक पात्रता फेरीसाठी तयारी करणाऱ्या भारतीय संघातील आपल्या चार खेळाडूंना सोडण्यासही नकार दिला आहे. यामध्ये दीपेंदू विश्वास, सुहेल भट, प्रियांश दुबे आणि टी अभिषेक सिंग यांचा समावेश आहे. वरिष्ठ संघासाठी नकार दिलेल्या खेळाडूंमध्ये अनिरुद्ध थापा, दीपक टांगरी, लालेंगमाविया, लिस्टन कोलाको, मनवीर सिंग, सहल अब्दुल समद आणि विशाल कैथ यांचा समावेश आहे.
मोहन बागान क्लबने सगळे लक्ष ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’ स्पर्धेकडे केंद्रित केले आहे. ‘आयएसएल’चे विजेतेपद मिळवून बागानने या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. त्यांचा पहिला सामना १६ सप्टेंबर घरच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर ते परदेशात इराणच्या सेपाहन एससी आणि जॉर्डनच्या अल हुसेन संघाशी खेळणार आहेत.