- विदर्भकन्या मोना मेश्रामला दृढ विश्वास
- भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन
तब्बल तीन वर्षांनंतर नागपूरच्या प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू मोना मेश्रामला पुन्हा भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविण्यात यश आले. यामागे मोनाचे परिश्रम होतेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेली मोना सध्या जिद्दीने सराव करीत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारताला विजय मिळवू देण्यात मी पूर्ण योगदान देईल व या मालिकेवर विजय मिळवूनच परत येईल, असा विश्वास तिने ‘लोकसत्ता’शी बोलतांना व्यक्त केला.
तिची पुन्हा निवड झाल्याने नागपूरकरांच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला आहे. सेंट्रल रेल्वेत कार्यरत २५ वर्षीय अष्टपैलू मोनाने नुकत्याच चन्नई येथे झालेल्या सिनिअर महिला गटातील एकदिवसीय लीग स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधले. झालेल्या सामन्यात तिने २२५ धावा काढत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले. आज तिची तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघात निवड झाल्याने तिचे कुटुंब आनंदात आहे. प्रकाश झोतापासून दूर असणारी मोना सध्या कुर्वेज शाळेच्या मदानावर कसून सराव करीत आहे. सकाळी अन् दुपारी सरावासह सामने देखील ती खेळत आहे.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यावर आणि काही वर्षे बाहेर असल्याने परत संघात संधी मिळणे कठीण असते. मात्र, गेल्या काही वर्षांतील माझी कामगिरी आणि घेतलेल्या मेहनतीच्या बळावर मला पुन्हा संघात स्थान मिळविण्यात यश आले. १० नोव्हेंबरला विजयवाडा येथे होऊ घातलेल्या सामन्यात मी ‘मेरीट ऑफ द बॉल’ खेळेल. विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावून मदानात उतरेल. मागील तीन वर्षांत संघाच्या बाहेर राहून मी अनेक नव्या गोष्टी आत्मसात केल्या. त्याचा नक्कीच संघाला व मला फायदा होईल. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र अंतिम ११ मध्ये स्थान मिळल्यास नक्कीच संधीचे सोने करून दाखवेल, असेही ती म्हणाली.
दोन वेळा विश्वचषक खेळण्याचा मान
व्हॉलीबॉल खेळात प्राविण्य मिळविल्यानंतर विदर्भकन्या मोनासाठी २०१२ हे वर्ष अविस्मरणीय ठरले. या वर्षी तिची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. मोनाने दोन वेळा विश्वकरंडक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व केले. २४ जून २०१२ ला मोनाचे आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात पदार्पण झाले. १० एप्रिल २०१३ ला अहमदाबाद येथे बांगलादेश वरुद्ध तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. २६ जून २०१२ ला तिने इंग्लंडविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी २० सामन्यात आपले स्थान निश्चित केले. तर ५ एप्रिल २०१२ ला बडोदा येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामान्यात ती भारतीय संघात होती. २०१० ते २०११ या वर्षी तिला बीसीसीआयच्या वतीने देण्यात येणारा एम.ए.चिदंबरम ‘बेस्ट ज्युनिअर लेडी क्रिकेटर’ हा पुरस्कार मिळाला. या कार्यकाळात तिने ८ सामन्यांमध्ये ६२३ धावा ठोकल्या. त्यामध्ये १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच सिनिअर आंतर विभागीय क्रिकेट स्पध्रेमध्ये पश्चिम झोनविरुद्ध तिने शानदार दुहेरी शतक झळकाविले. गुंटूरमध्ये खेळण्यात आलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत मध्य झोनकडून तिने २२५ धावांची उल्लेखनीय खेळाची प्रदर्शन करत अनेकांचे लक्ष वेधले होते.
भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता मोनामध्ये आजही आहे, म्हणूनच तिची पुन्हा निवड झाली आहे. सध्या तिचा कसून सराव सुरू आहे. मोना मागील तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असली तरी तिचा फॉर्म कायम आहे. तिचा सराव करताना सामन्यामध्ये आत्मविश्वास आणि खेळादरम्यानचा मानसिक दबाव कशा प्रकारे संतुलित ठेवता येईल याकडे माझा अधिक भर आहे. आजचा तिचा फॉर्म जर सामन्यातही कायम राहिला तर ती नक्कीच चांगले प्रदर्शन करेल असा मला विश्वास आहे. तिच्या सरावाला वेळ मर्यादा नसून जोपर्यंत तिचे मानसिक समाधान होत नाही, तोपर्यंत आमचा सराव सुरू असतो.
– प्रशिक्षक संदीप