MLC, Monank Patel Record: मेजर लीग क्रिकेट २०२५ स्पर्धेत अमेरिकेचा फलंदाज मोनांक पटेलने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या मोनांकने या स्पर्धेतील रेकॉर्डब्रेक खेळी केली आहे. तो या स्पर्धेतील एकाच डावात सर्वात मोठी खेळी करणारा अमेरिकन फलंदाज ठरला आहे. यासह त्याने कोरी अँडरसनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
एमआय न्यूयॉर्क विरूद्ध सिएटल ऑकर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मोनांक पटेलची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ५० चेंडूंचा सामना करत ९३ धावांची वादळी खेळी केली.या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ७ षटकार मारले. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या तुफानी खेळीसह तो मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणारा अमेरिकन फलंदाज ठरला आहे. आता हा रेकॉर्ड कोण मोडून काढणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मोनांक पटेलच्या शानदार खेळीच्या बळावर एमआय न्यूयॉर्क संघाने २०० धावांचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सिएटल ऑकर्स संघाने २० षटकांअखेर २०० धावांचा डोंगर उभारला.
एमआय न्यूयॉर्क संघाकडून धावांचा पाठलाग करताना कायरन पोलार्डने १० चेंडूत २६ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. एमआय न्यूयॉर्क संघाकडून ९३ धावांची खेळी करणारा मोनांक पटेल विजयाचा हिरो ठरला. एमआय न्यूयॉर्क संघाचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला आहे.
मोनांक पटेलच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत त्याने ६७ वनडे सामन्यांमध्ये २१९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि १७ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४३ सामन्यांमध्ये ९२० धावा केल्या आहेत. अवघ्या ४३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४ शतकं आणि २१ अर्धशतकं झळकावली आहेत.