विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चांना उधाण आलं होतं. विंडीज दौऱ्याआधी धोनी आपली निवृत्ती जाहीर करणार अशा बातम्या काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या, मात्र विराटने केलेल्या विनंतीनंतर धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला. यानंतर गुरुवारी विराट कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली. मात्र ही बातमी चुकीची असल्याचं निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

भारताचा बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदनेही धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. “काय निर्णय घ्यायचा आहे हे धोनीला चांगलं माहिती आहे. पण माझ्यामते त्याच्यासाठी काहीही सिद्ध करायचं राहिलेलं नाहीये. धोनीचे संपूर्ण देशभरात चाहते आहेत. त्याला जे जे साध्य करायचं होतं ते त्यानं करुन दाखवलं आहे. भारतासाठी त्याने दोन विश्वचषक जिंकले आहेत. तो एक सर्वोत्तम कर्णधार होता. त्यामुळे निवृत्ती कधी स्विकारायची हे त्याच्यापेक्षा चांगलं कोणीही ठरवु शकत नाही. निवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्यायला हवा.” पीटीआयशी बोलत असताना आनंदने आपली प्रतिक्रीया दिली.

विंडीज दौऱ्यात धोनीने क्रिकेटमधून दोन महिने विश्रांती घेण्याचं ठरवलं होतं. यानुसार त्याने भारतीय सैन्यात दोन महिने आपलं कर्तव्य पार पाडलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठीही निवड समितीने धोनीच्या नावाचा विचार केला नाही. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीबद्दल काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. १५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार – निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद