भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय. धोनीने सध्या २ महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करतो आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम केंद्रीय गृहमंत्रालयाने काढून टाकल्यानंतर, सध्या काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या उभरत्या आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर घेतल्याचं समजतंय. आगामी काळात धोनी आपल्या या योजनेबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला माहिती देणार आहे. Times Now या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

धोनी सध्या दक्षिण काश्मीर परिसरात आपल्या सैन्यदलातल्या तुकडीसोबत गस्त घालण्याचं काम करतोय. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होता, मात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. त्यामुळे भविष्यकाळात केंद्रीय क्रीडा मंत्रालय धोनीच्या या योजनेला पाठींबा दर्शवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.