इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. मोठ्या फटका मारण्याच्या नादात धोनी स्वस्तात झेलबाद होऊन तंबूत दाखल झाला होता. खरंतर कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतरचा धोनीचा पहिलाच एकदिवसीय सामना असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. पण त्याने चाहत्यांची निराशा केली. पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने धोनी मैदानात तग धरून फलंदाजी करेल आणि संघाच्या धावसंख्येला सावरेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, इंग्लंडच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना धावसंख्येची सरासरी वाढवण्यासाठी धोनीचा आक्रमक रुप धारण करण्याचा प्रयत्न पहिल्या सामन्यात पूर्णपणे फसला. असे असले तरी भारतीय संघाने हा सामना विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या शतकी खेळीच्या जोरावर जिंकला.
#TeamIndia batsman @msdhoni sweating it out in the nets ahead of the 2nd ODI against England #INDvENG pic.twitter.com/XMRQVpx3Dn
— BCCI (@BCCI) January 17, 2017
आता कटक येथे गुरूवारी खेळविण्यात येणाऱया दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सराव करत आहे. धोनी पहिल्या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या स्थानावर फलंदाजी करताना आश्वासक खेळीची अपेक्षा असते. पण ‘कॅप्टन कूल’ धोनी आज नेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांना साजेशा अशा आक्रमक फटक्यांचा सराव करताना दिसला. त्यामुळे धोनीचा कटक एकदिवसीय सामन्यासाठी आपल्या फलंदाजी रणनितीत बदल करण्याचा विचार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. धोनीच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयच्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड करण्यात आला असून त्याच्या आक्रमक फलंदाजीचा नूर पाहता दुसऱया एकदिवसीय सामन्यात धोनी आणखी वरच्या स्थानावर किंवा पुन्हा एकदा मॅच फिनीशरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोहलीने विजयी बोहनी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. पण मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला दुसऱया एकदिवसीय सामना जिंकण्याची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर कटक सामन्यात भारतीय फलंदाजी क्रमवारीत नेमके कोणते बदल पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. नेटमधील सरावात धोनी डावखुऱया गोलंदाजांच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करताना दिसतो. भारतीय संघाचा गुरुवारी दुसरा तर येत्या रविवारी कोलकाता येथे तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीयस संघ तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला देखील सामोरे जाणार आहे. कानपूर, नागपूर आणि बंगळुरू येथे तीन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत.