मुंबईच्या एअर इंडिया संघाने चंदू बोर्डे चषक ट्वेन्टी२० स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर नोंदविली. अंतिम लढतीत त्यांनी मुंबईच्याच इंडियन ऑईल संघाचा १५ धावांनी पराभव केला.
थेरगाव येथे शशी काटे फाऊंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम फलंदाजी करताना एअर इंडिया संघाने २० षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या. त्यामध्ये प्रशांत नाईक याने शैलीदार खेळ करीत ७२ धावा टोलविल्या. सुशांत मराठे (२२) व रौनक शर्मा (नाबाद २६) यांनीही संघाच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. इंडियन ऑईल संघाकडून रोहन राजे याने २५ धावांमध्ये तीन बळी घेतले. अमेय श्रीखंडे (४०) व अब्बास अली (३५) यांनी दमदार फलंदाजी करूनही इंडियन ऑईल संघास निर्धारित षटकांत ९ बाद १३५ धावांपर्यंतच मजल गाठता आली. एअर इंडियास पाच लाख रुपयांची कमाई झाली तर इंडियन ऑईल संघास तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
अंतिम सामन्याचा मानकरी पारितोषिक प्रशांत नाईक याला मिळाले. अमेय श्रीखंडे (स्पर्धेचा मानकरी), लक्ष्मण आतकरे (गोलंदाज), विनय पाटील (फलंदाज) यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे व कपिल देव यांच्या हस्ते झाला.
अजूनही मैदानावर खेळण्याची इच्छा : कपिल देव
येथील क्रिकेटसाठी निर्माण झालेले उत्साही वातावरण पाहून मलाही पुन्हा मैदानावर हातात बॅट घेऊन खेळण्याची इच्छा होते. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात क्रिकेटसाठी विपुल नैपुण्य आहे. येथील महानगरपालिकेने निर्माण केलेल्या क्रीडासुविधा खरोखरीच अव्वल दर्जाच्या आहेत, असे कपिल देव यांनी सांगितले. ते म्हणाले, बोर्डे हे मला गुरुस्थानी असून त्यांच्यासारखे महान खेळाडू पुन्हा घडणार नाहीत.
संक्षिप्त निकाल
एअर इंडिया : २० षटकांत ८ बाद १५४ (सुशांत मराठे २२, प्रशांत नाईक ७२, रौनक शर्मा नाबाद २६; रोहन राजे ३/२५, अमित दाणी २/२९, अमेय श्रीखंडे २/२७) वि.वि. इंडियन ऑईल : २० षटकांत ९ बाद १३९ (अमेय श्रीखंडे ४०, अब्बास अली ३५; मनीष राव २/१७, सागर त्रिवेदी २/१९, जॉन अब्राहम २/२७)