मुंबई व पुण्याने दुसऱ्या दिवशीही येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेवर वर्चस्व राखले. यजमान नाशिकनेही आपल्या कामगिरीत केलेली सुधारणा हेही या दिवसाचे ठळक वैशिष्टय़े म्हणावे लागेल.
१४ वर्षांआतील आर्टिटिक्स जिम्नॅस्टिक गटात मुंबईच्या श्रेयस चौधरीने एकूण ६५.७० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. मुंबईचा श्रेयस फलटणकर व्दितीय तर पुण्याचा शुभम करमरकर तृतीय स्थानी राहिला. मुंबईपाठोपाठ श्रेयस भावसार, निखील पवार, श्रेयस जाधव, कबीर मुरूगकर, ओमकार मालपुरे, ईशान खुर्रा, भाविक भोसले यांच्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर नाशिकने उपविजेतेपद मिळविले. या गटात १७ वर्षांआतील मुलींमध्ये श्रावणी राऊत व भक्ती तिवारी या मुंबईच्या खेळाडूंनी प्रथम व व्दितीय तर तृतीय क्रमांक पुण्याच्या रितू पोळ हिने मिळविला. १९ वर्षांआतील मुलींमध्ये रूचा दिवेकर (४३.९० गुण) व तनया कुलकर्णी (४०.८५) या पुण्याच्या दोघींनी प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविला. मुंबईची शरयू पोळ (३८.९०) तृतीय स्थानी राहिली. मुंबईकडून अदिती गांधी, केतकी गोखले यांनीही चांगली कामगिरी केली.
ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकच्या १९ वर्षांआतील गटात मधुरा तांबे (६५.५५) व हिमानी गायकवाड (६२.७५) या पुण्याच्या खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय तर मुंबईच्या मिताली मोकाशीने (६२.७५) तृतीय क्रमांक मिळविला. पुणे व मुंबईच्या संघात कमी खेळाडू असल्यामुळे त्याचा लाभ यजमान नाशिकला मिळाला. सांघिक विजेतेपद नाशिकला मिळाले. कोल्हापूर व्दितीय तर अमरावती तृतीय स्थानी राहिले. १७ वर्षांआतील गटात दिशा निंद्रे व निकीता काटकर यांनी प्रथम व व्दितीय तर पुण्याच्या श्रेया गुजराथीने तृतीय क्रमांक मिळविला. मुंबईने १९४.७५ गुणांसह या गटाचे सांघिक विजेतेपद तर अमरावतीने उपविजेतेपद मिळविले. नाशिक तृतीय स्थानी राहिले.