अहमदाबाद येथे रंगलेल्या पॉली उम्रीगर करंडक पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाने जेतेपदावर मोहोर उमटवली. मुंबई आणि बडोदा संघाचे प्रत्येकी १० गुण झाले. पण साखळी फेरीत मुंबईने बडोद्याला हरवल्यामुळे मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने महाराष्ट्राचा पहिला डाव २२१ धावांवर संपुष्टात आणला. त्यात फिरकी गोलंदाज ध्रुव भेदकने सहा बळी तर अजित शेखने तीन बळी मिळवत महाराष्ट्राच्या डावाला खिंडार पाडले. प्रत्युत्तरादाखल मुंबईने ७ बाद २२२ धावा केल्या. ६ बाद ११० अशी मुंबईची स्थिती असताना वैष्णव नार्वेकर आणि तनुष कोटियन यांनी सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावरच विजय साकारला. नार्वेकरने नाबाद ११२ धावांची खेळी केली तर कोटियनने ६० धावा फटकावल्या. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.