दिएगो फोर्लानची हॅट्ट्रिक; ५-० अशा विजयासह गुणतालिकेत अव्वल

मोक्याच्या क्षणी गोल करून प्रतिस्पर्धी संघांना हतबल करणाऱ्या केरळा ब्लास्टर्स संघाला शनिवारी यजमान मुंबई सिटी एफसीसमोर शरणागती पत्करावी लागली. अंधेरी क्रीडा संकुलात झालेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेच्या या सामन्यात उरुग्वेचा आघाडीपटू दिएगो फोर्लानने केरळवर गोल‘ब्लास्ट’ केला. फोरलानची हॅट्ट्रिक आणि ब्रिटो अल्व्हेस व लुसियन गोइयन यांच्या प्रत्येकी एका गोलने मुंबईला ५-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयाबरोबर मुंबईने घरच्या मैदानावरील अपयशाचा पाढा पुसला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले.

उरुग्वेचा दिग्गज फुटबॉलपटू फोर्लानच्या चाहता वर्गात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीचा प्रत्यय या लढतीत आला. फोर्लानच्या नावाचे आणि छायाचित्रांचे फलक संपूर्ण स्टेडियममध्ये झळकत होते. फोर्लाननेही प्रेक्षकांच्या या प्रेमाला चटकन प्रतिसाद दिला. चौथ्या मिनिटाला अर्जेटिनाचा मध्यरक्षक मॅटीयास डेफेडेरिकोने दिलेल्या पासवर फोरलानने सहज गोल केला. केरळचा गोलरक्षक ग्रॅहम स्टॅक याला काही समजायच्या आत फोर्लानने मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १३व्या मिनिटाला कॉर्नरवरून आलेल्या चेंडूवर सुनील छेत्रीचा गोल करण्याचा प्रयत्न स्टॅकने रोखला. सुनीलने डाव्या पायाच्या टाचाने गोल करण्याचा प्रयत्न केला. सुनीलच्या या प्रयत्नाने युरो चषक स्पध्रेतील हंगेरीविरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या गोलची आठवण झाली. पुढच्याच मिनिटाला फोर्लानने फ्री किकवर गोल करून मुंबईची आघाडी दुप्पट केली.

मध्यंतरानंतर केरळकडून आक्रमक खेळ अपेक्षित होता, परंतु मुंबईच्या बचावफळीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. ६३व्या मिनिटाला फोर्लानने हॅट्ट्रिक पूर्ण करताना मुंबईची बाजू अधिक भक्कम केली. आपली कामगिरी चोख बजावणाऱ्या फोर्लानला माघारी बोलावण्याचा निर्णय प्रशिक्षकांनी घेतला. त्यानंतर ब्रिटो अल्व्हेसने ६९व्या मिनिटाला व लुसियन गोइयनने ७३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून मुंबईच्या विजयाचा मार्ग सुकर केला.