- नॉर्थ ईस्ट युनायटेडचा विजयरथ रोखला
- फोर्लनचा पेनल्टी स्पॉट किकवर गोल
खचाखच भरलेले स्टेडियम, तुफान गर्दी.. मुंबई सिटी एफसीच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात यापैकी काहीच नसले तरी प्रेक्षकांमधील उत्साहाने लढतीत जीव ओतला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी खास ढोल-ताश्यांनी यजमान क्लबचा प्रोत्साहन वाढवला. अंधेरी क्रीडा संकुलात शुक्रवारी झालेल्या इंडियन सुपर लीगच्या सामन्यात यजमानांनी १-० अशा फरकाने विजय मिळवत नॉर्थ ईस्ट युनायटेडचा विजयरथ रोखला. उरुग्वेचा आघाडीपटू व कर्णधार डिएगो फोर्लनने पेनल्टी स्पॉट किकवर विजयी गोल केला.
सामन्याला येणाऱ्या प्रत्येकाचे ढोल-ताशे वाजवून स्वागत होत होते. स्टेडियमवरही मुंबईच्या प्रत्येक प्रयत्नांना तसाच प्रोत्साहन मिळत होता. म्हणूनच सामन्यात वरचढ ठरूनही नॉर्थ ईस्ट युनायटेडला मुंबईला नमवणे अवघड गेले. पहिल्या सत्रात युनायटेडच्या कोफी नॅड्रीच्या अप्रतिम व्हॉलीने प्रेक्षकांची मने जिंकली, परंतु गोलरक्षक रोबेटरे व्हॉल्पाटोचा बचाव भेदण्यात त्याला अपयश आले. युनायटेडने गोल करण्याचे सर्वाधिक प्रयत्न निर्माण केले, परंतु नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. जपानचा कत्सुमी युसाला पाच यार्डवरून गोल करण्यात आलेले अपयश मुंबईच्या पथ्यावर पडले. आघाडीपटू एमिलियानो अल्फारोनेही मुंबईची बचावफळी भेदण्याचे अनेक प्रयत्न केले. पहिल्या सत्रात युनायटेडने वर्चस्व राखले असले तरी मुंबईने गोलशून्य बरोबरी राखण्यात यश मिळवले.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून मुंबईने आक्रमणावर भर दिली. ५४ व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. रिगन सिंगच्या चुकीचा फटका युनायटेडला बसला. पंचांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली आणि डिएगोने त्यावर गोल करून मुंबईला आघाडी मिळवून दिली. भरपाई वेळेच्या अखेरच्या मिनिटाला युनायटेडला सलग तीन कॉर्नर मिळूनही गोल करण्यात अपयश आले. मुंबईने युनायटेडविरुद्ध दुसऱ्या सत्रात गोल करण्याची परंपरा याही लढतीत कायम राखून विजय मिळवला.