गेल्या दोन सामन्यांत घरच्या मैदानावर एकही गोल करता न आलेल्या मुंबई सिटी एफसीने अप्रतिम खेळाचा नजराणा पेश केल्यामुळे नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर नवचैतन्य पसरले. लालरिंडिका राल्टे आणि मॅन्यूएल फ्राइडरिच यांच्या गोलमुळे मुंबईने बलाढय़ अ‍ॅटलेटिको डी कोलकाताचा २-१ असा पराभव करून इंडियन सुपर लीगमध्ये उपांत्य फेरीत मजल मारण्याच्या अंधूकशा आशा जिवंत ठेवल्या.
सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मुंबईने सामन्यावर वर्चस्व गाजवले. फ्रान्सचा अव्वल खेळाडू निकोलस अनेल्का मैदानात उतरल्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता, मात्र गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळे घरच्या चाहत्यांची निराशा होत होती. अखेर पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी लालरिंडिकाने ४०व्या मिनिटाला पहिला गोल करत मुंबईला आघाडी मिळवून दिली. थिआगो रिबेरोच्या पासवर चेंडूवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याने डाव्या पायाने अलगदपणे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. लालरिंडिकाचा हा स्पर्धेतील पहिला गोल ठरला. ६०व्या मिनिटाला शॉर्ट कॉर्नरवरून लुइस गार्सियाने दिलेल्या पासवर मुंबईचा गोलरक्षक सुब्रतो पॉलला चकवून बलजित साहनीने गोल करून कोलकाताला बरोबरी साधून दिली. लालरिंडिकाने फ्री-किकवर दिलेल्या पासवर फ्राइडरिचने ६७व्या मिनिटाला मुंबईसाठी दुसरा गोल केला. मुंबईच्या अभिषेक यादवने गोल करण्याची सुरेख संधी वाया घालवल्यानंतर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना कोलकाताच्या बोर्जा फर्नाडेसने गोल लगावला. पण पंचांनी हा गोल ‘ऑफसाइड’ ठरवल्यामुळे मुंबईला विजय साकारता आला. मुंबई सिटी एफसीचे उपांत्य फेरीतील स्थान डळमळीत असले तरी २० डिसेंबरला होणारा अंतिम सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असल्याचे संकेत संयोजकांनी दिले.