दर वर्षीप्रमाणे यंदाची आयपीएल खेळवली गेली. पण यंदाच्या मोसमात ही स्पर्धा जास्त रंगलेली पाहायला मिळाली नाही. एक तर भारताचे दिग्गज खेळाडू या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरले. पंचांचे जवळपास २५ निर्णय या हंगामात चुकीचे ठरले. त्याचबरोबर दर वर्षीच्या वेळापत्रकाचा या वेळी साऱ्यांनाच कंटाळा आला. लोकांना नेहमीच बदल हवा असतो, तो बदल आयोजनामध्ये कुठेही दिसलेला नाही. त्याचबरोबर ‘क्वालिफायर-१’ हा सामना रात्री दीड वाजेपर्यंत खेळवला गेल्याने ही स्पर्धा टीकेची धनी ठरली. त्यामुळे ही मनोरंजनाची फोडणी या वेळी अळणीच ठरली.

डाव्यांचा तडाखा

यंदाच्या आयपीएलमध्ये डावखुऱ्या फलंदाजांनी सर्वात जास्त धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी पाहिली तर पहिल्या पाच फलंदाजांमध्ये अव्वल चार हे डावखुरे आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा वॉर्नरच्या (६४१) नावावर आहेत. दुसरा क्रमांक आहे कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरचा (४९८), तिसरा शिखर धवन (४७९) आणि चौथा सुरेश रैना (४४२). त्यानंतर ४२१ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे तो पुण्याचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ. हशिम अमला हा सावध फलंदाजीसाठी परिचित आहे, पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तब्बल दोन शतके लगावली आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने सहावे स्थान पटकावले.

मध्यरात्रीसखेळ चाले

कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील बाद फेरीचा सामना चालला तो रात्री दीड वाजेपर्यंत. ही वेळ कोणासाठीही योग्य अशी नाहीच. हे सारे ठरवत असताना स्टेडियमवरील चाहत्यांचा कोणताही विचार केला नाही. त्यापेक्षा महत्त्वाचे खेळाडूंचाही विचार केला गेला नाही. जर रात्री दीडपर्यंत खेळाडू मैदानात असेल तर दुसऱ्या दिवशी तो सामना कसा खेळेल, हेसुद्धा आयपीएल प्रशासकीय समितीच्या मनात आले नाही. ‘क्वॉलिफायर-२’ सामना कोलकात्याने गमावला, याचे कारण या सामन्याच्या पूर्वसंध्येला त्यांना विश्रांतीच मिळाली नाही, उलटपक्षी त्यांना मध्यरात्रीपर्यंत खेळावे लागले. आयपीएलचे वेळापत्रक पाहता साखळी सामन्याला राखीव दिवस देता येणार नाही, हे मान्य केले तरी बाद फेरीच्या सामन्यांना राखीव दिवस का ठेवला नाही, याचे उत्तर आयपीएलच्या समितीकडे कुठे आहे? खेळाडू लिलावात विकले गेल्यावर ते काहीही करून कधीही खेळतील, हा विचार आयपीएलची समिती करीत असेल तर ते खेळाचे दुर्दैव आहे.

आराखडय़ात बदल हवा

आयपीएलचा आराखडा हा दहा वर्षांपासून तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक आयपीएलचा सामना बघण्याची उत्सुकता संपली आहे. अखेरचे काही सामने बघण्याकडेच चाहत्यांचा कल असतो. त्यामुळे आयपीएलने आपल्या आराखडय़ात बदल करणे गरजेचे आहे. जर दीड महिना ही स्पर्धा चालत असेल तर बीसीसीआयला चांगला नफा होईल, पण ते चाहत्यांची साथ हळूहळू गमावतील. आयपीएल म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, तिला अधिक चांगल्या पद्धतीने कसे सांभाळता येईल, हा विचार करणे क्रमप्राप्त आहे.

कोहली, धोनी, रोहित अपयशी

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू किती धावांचे इमले उभारतात, याकडे चाहत्यांचे लक्ष असते. पण या हंगामात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा हे पुरते अपयशी ठरलेले दिसले. कोहली ज्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांच्या राशी उभारल्या, त्याला या वेळी फक्त ३०८ धावाच करता आल्या. सामना यशस्वीपणे संपवण्यासाठी धोनी माहीर आहे. पण मोसमाच्या सुरुवातीलाच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले आणि धोनीच्या धावाही आटल्या. रोहितला या हंगामातील एकाही सामन्यात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, पण रोहित मात्र धावांचा दुष्काळ भोगत होता.

युवा खेळाडूंनी मने जिंकली

यंदाच्या आयपीएलमध्ये मने जिंकली ती युवा खेळाडूंनी. दिल्ली डेअरडेव्हिल्समधून ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि करुण नायर यांनी दमदार फलंदाजी केली. मुंबईचा नितीश राणा या वेळी फलंदाजीच्या जोरावर प्रकाशझोतात आला. पुण्याचा राहुल त्रिपाठी, कोलकात्याचा मनीष पांडे यांनी सातत्यपूर्ण फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये हैदराबादच्या रशीद खानने कौतुकास्पद कामगिरी केली. पुण्याचा जयदेव उनाडकट, मुंबईचा जसप्रीत बुमराह, किंग्ज इलेव्हन पंजाबचा संदीप शर्मा, हैदराबादचा सिद्धार्थ कौल यांनी भेदक मारा करीत स्पर्धेत रंगत आणली.

सदोष पंचगिरी

पंचांचा निर्णय अंतिम राहील, हे साऱ्याच खेळांमध्ये आपण ऐकतो. पण त्या दर्जाची पंचगिरी होणेही त्यामध्ये अपेक्षित असते. या आयपीएलमध्ये ५९ सामन्यांमध्ये २५ निकाल चुकीचे ठरले. यांपैकी १३ निकाल वादग्रस्त होते. कोलकाता नाइट रायडर्सला पाच, मुंबई इंडियन्सला तीन वेळा या चुकीच्या निकालांचा सामना करावा लागला. बीसीसीआयने गेल्या वर्षी आयसीसीकडे अनिल दांडेकर आणि नितीन मेनन यांची शिफारस केली होती, पण या दोघांनी प्रत्येकी तीनदा चुकीचे निकाल दिले. या सदोष पंचगिरीचा मोठा फटका मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बसला. कारण दोन सामन्यांमध्ये त्याला चुकीचे बाद देण्यात आले. या दोन्ही वेळी त्याला पायचीत बाद दिले आणि दोन्ही वेळा चेंडूचा आपल्या बॅटला स्पर्श झाल्याचे रोहितने पंचांना सांगितले, पण पंचांनी त्याचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. उलटपक्षी बऱ्याचदा पंचांशी वाद घातला म्हणून काही खेळाडूंना ताकीद, तर काहींना दंड केला गेला. पंचांच्या चुकीच्या निर्णयांचा सर्वात फायदा झाला तो कोलकात्याच्या रॉबिन उथप्पाला. कारण दोनदा तो बाद असून त्याला नाबाद ठरवण्यात आले. एका सामन्यात तर वेगळीच गंमत झाली. सनरायर्झस हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर सातव्या चेंडूचा पहिला चेंडूही वॉर्नरनेच खेळला. या वेळी मैदानावर नितीन मेनन आणि सी. के. नंदन हे पंच होते. पण ही घोडचूक त्यांच्या लक्षातच आली नाही. जर मैदानावरील पंचच असे वागायला लागले तर दाद मागायची कोणाकडे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

– प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com