कबड्डी हा मुंबईकरांचा सर्वात आवडता खेळ. आता मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या २८ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. सध्या सत्तेवर असलेल्या मारुती जाधव गटाला अनिल घाटे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे आव्हान उभे ठाकले आहे, परंतु गतवर्षी निवडणूक लढणारा राजाराम पवार गट मात्र यंदाच्या निवडणुकीत सहभागी झालेला नाही.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी संपली असून, एकंदर ६४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. १३ डिसेंबरला वैध उमेदवारींची नावे जाहीर होतील, तर १५ डिसेंबपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. त्यामुळे वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरातील वर्दळ वाढू लागली आहे.
सत्ताधारी मारुती जाधव गटाकडून अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह विश्वास मोरे, मनोहर इंदूलकर, दादा अमृते, राजेश पाडावे, दिगंबर शिरवाडकर, कृष्णा तोडणकर, संजय शेटय़े, शिवसेना नेते मिलिंद तुळसकर निवडणूक लढणार आहेत. तर अनिल घाटे यांच्या गटातून वसंत सूद, दत्ता पारकर, मनोहर साळवी, आशिष चौगुले आणि मिलिंद कोलते आदी मंडळी नशीब आजमावणार आहेत.  मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या राजाराम पवार गटात तारक राऊळ, शशी राऊत, जया शेट्टी, श्रीधर जाधव, भार्गव कदम आदी व्यक्तींचा समावेश होता. परंतु यंदा पवार गटाने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.