मुंबईतील देव शाहने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळात जगज्जेता होण्याचा पराक्रम केला आहे. ब्राझीलमधील जुइझ डे फोरा येथे झालेल्या जागतिक शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सात वर्षांखालील गटात जेतेपद पटकावून देव शाहने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. दक्षिण मुंबईतील धीरूबाई अंबानी शाळेचा विद्यार्थी असलेल्या देवने मोंगोलियाचा ओचिरबॅट खावाजॅमट्स आणि उझबेकिस्तानचा सिंड्रोव्ह इस्लोमबेक यांच्यासह ९ पैकी प्रत्येकी ७.५ गुणांची कमाई केली; पण देव शाहने सरस कामगिरीच्या आधारे जगज्जेता होण्याचा मान पटकावला. या विजेतेपदासह फिडेच्या कँडिडेट मास्टर स्पर्धेसाठी पात्र होण्याची किमया देवने केली आहे. देव शाहचे सध्याचे फिडे मानांकन १४४८ इतके आहे. मॅग्नस कार्लसनला बुद्धिबळातील युगपुरुष मानणाऱ्या देवने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. वयाच्या ११व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवण्याचे उद्दिष्ट त्याने बाळगले आहे. सप्टेंबर महिन्यात कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत देवने सात वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले होते.