पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागामुळे शिवसैनिकांनी निदर्शने करून सराव शिबिरात व्यत्यय आणल्याप्रकरणी हॉकी इंडिया लीगमधील मुंबई मॅजिशियन्स संघाने आता आपला तळ मुंबईतून नवी दिल्लीत हलवला आहे.‘‘मुंबई मॅजिशियन्स संघाने आपला मुक्काम दिल्लीत हलवला आहे. संघातील खेळाडू सोमवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले,’’ असे हॉकी इंडियाचे सहसचिव मनोज भोरे यांनी सांगितले. मुंबई संघात चार पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे रविवारी जवळपास १०० शिवसैनिकांनी मुंबई हॉकी असोसिएशनच्या महिंद्रा स्टेडियमवर निदर्शने करून सराव शिबिरात अडथळा आणला होता. ‘पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देऊ नका,’ अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती.
हॉकी इंडिया लीगमधील सहा संघांनी पाकिस्तानच्या नऊ हॉकीपटूंवर बोली लावली असून मुंबई संघाने महमूद रशीद, फारीद अहमद, मुहम्मद तौसिफ आणि इम्रान बट यांना करारबद्ध केले आहे. मुंबईत २० जानेवारीला पंजाब संघाविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू सहभागी होतील का, असे विचारले असता भोरे म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे खेळाडू मुंबई संघातच नव्हे तर अन्य संघातही आहेत. त्यामुळे याचा निर्णय आता हॉकी इंडियालाच घ्यावा लागेल.’’ मुंबई मॅजिशियन्सचा पहिला सामना नवी दिल्लीत १६ जानेवारीला दिल्ली वेव्हरायडर्स संघाविरुद्ध होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंबई मॅजिशियन्स संघाचा तळ दिल्लीत
पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागामुळे शिवसैनिकांनी निदर्शने करून सराव शिबिरात व्यत्यय आणल्याप्रकरणी हॉकी इंडिया लीगमधील मुंबई मॅजिशियन्स संघाने आता आपला तळ मुंबईतून नवी दिल्लीत हलवला आहे.‘‘मुंबई मॅजिशियन्स संघाने आपला मुक्काम दिल्लीत हलवला आहे.
First published on: 15-01-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai magicians shift base to delhi