तब्बल ४५० आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू आणि ४८ देशांमध्ये रंगणाऱ्या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेचा थरार याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. ही स्पर्धा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला या दोन गटांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू, आदर्श शरीरयष्टी, अ‍ॅथलेटिक शरीर आणि क्रीडा शरीरयष्टी असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत ४३ शरीरसौष्ठवपटूंचा संघ दोन संघांसह उतरणार असून भारताला या स्पर्धेतून ५-६ पदकांची आशा आहे. पुरुषांच्या संघामध्ये सर्वाचे लक्ष महाराष्ट्राच्या संग्राम चौगुलेवर असेल. गेले काही महिने स्पर्धापासून लांब राहत त्याने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये सुनीत जाधव, स्वप्निल नरवडकर, बी. महेश्वरन यांच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा असतील. महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी ही स्पर्धा फार महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत महिलांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबरच मॉडेलिंग आणि फिजिक अशाही स्पर्धा होणार आहेत. भारताकडून या स्पर्धेत ममता देवी, सिबलिका साहा आणि सरिता थिंगबैजम शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरणार असून मॉडेल आणि फिजिक स्पर्धेत महाराष्ट्राची करुणा वाघमारे सहभागी होणार आहे.