स्थानिक क्रिकेट हंगामात यंदा प्रत्येक वयोगटात मुंबई क्रिकेट संघाच्या पदरी अपयश आले. परंतु हंगामाअखेरीस मुंबईच्या १४ वर्षांखालील चमूने पश्चिम विभागीय क्रिकेट स्पध्रेचे विजेतेपद जिंकून दिले आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या अनिर्णीत लढतीत मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर बाजी मारली. याआधी बडोदा व गुजरातविरुद्धच्या अनिर्णीत लढतीतसुद्धा मुंबईने पहिल्या डावात आघाडी मिळवली होती. त्यामुळे गुणांच्या बळावर मुंबईने या जेतेपदावर नाव कोरले.
महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील ३२० धावांना सामोरे जातना मुंबईने पहिल्या डावात ४६१ धावा केल्या. मुंबईच्या सलामीवीर रितिक शर्माने अर्धशतक झळकावताना अर्जुन तेंडुलकर (२६) सोबत ७० धावांची सलामी दिली. त्यानंतर हशिर दाफेदार (१८४) आणि अथर्व अंकोलेकर (११७) यांच्या शतकांच्या बळावर मुंबईने समाधानकारक धावसंख्या उभारली. दाफेदार आणि अंकोलेकर जोडीने पाचव्या विकेटसाठी २८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी फुटल्यावर मग मुंबईचे उर्वरित सहा फलंदाज अवघ्या ४६ धावांत तंबूत परतले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : ३२०
मुंबई (पहिला डाव) : १५९.१ षटकांत सर्व बाद ४६१ (रितिक शर्मा ५४, हशिर दाफेदार १८४, अथर्व अंकोलेकर ११७; सारीश अकलुंजकर ३/७८, लौकिक सूर्यवंशी ५/८८)
महाराष्ट्र (दुसरा डाव) : ७ षटकांत
१ बाद २३ (आनंद विश्वकर्मा नाबाद १०; मुकुंद सरदार १/४)