इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या हंगामातील घरच्या मदानावरील पहिलीच लढत खेळण्यास मुंबई सज्ज झाले असून मार्को मॅटाराझ्झीच्या चेन्नईयन एफसीसमवेत त्यांचा शुक्रवारी मुकाबला होणार आहे. आघाडीचा आक्रमणपटू सुनील छेत्री या सामन्याच्या माध्यमातून आयएसएलमध्ये पदार्पण करीत असून दिग्गज खेळाडू निकोलस अनेल्काच्या साथीने मुंबईला विजयपथावर नेण्यास तो उत्सुक असेल.
भारतीय संघातील खेळाडूंनी आता आयएसएलमध्ये आपली चमक दाखवण्यास प्रारंभ केला आहे. दिल्लीच्या रॉबिन सिंगने पदार्पणातच पुण्याविरुद्ध गोल मारला होता. त्याचीच पुनरावृत्ती छेत्रीकडून अपेक्षित आहे. तसेच मुंबईचा भरवशाचा गोलरक्षक सुब्रतो पॉल हादेखील संघातून खेळण्यास उत्सुक आहे. पहिल्या दोन सामन्यांत मुंबईला पुण्याकडून १-३ अशी हार पत्करावी लागली होती. त्यानंतर कोचीला दमट हवामान आणि ६० हजार केरळ समर्थक प्रेक्षकांचा मुकाबला करताना मुंबईने तो सामना बरोबरीत सोडवला. मुंबईचा खेळ बहारदार झाला, परंतु विजय संपादन करण्यात त्यांना यश आले नाही. यंदाच्या हंगामात घरच्या मदानावर पहिलीच लढत खेळताना मुंबईच्या संघात फ्रेड्रिक पिक्युने आणि सोनी नॉर्डे यांना आता गॅब्रिएल फर्नाडिस या भारतीय खेळाडूची चांगली साथ मिळत आहे. त्यातच, छेत्री-अनेल्का यांची जोडी जमली, तर मुंबईचे वर्चस्व निश्चितपणे जाणवेल.
दुसरीकडे, चेन्नईयनचा प्रारंभ निराशाजनक झाला होता. सलामीलाच त्यांना कोलकात्याकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. पण त्यानंतर स्टीव्हन मेंडोझा आणि एलानो ब्लूमर यांच्या बहारदार खेळाच्या जोरावर त्यांनी बलाढय़ गोव्यावर ४-० अशी मात केली. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी ते सज्ज होत आहेत.
सामन्याची वेळ :
सायं. ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण :
स्टार स्पोर्ट्स २ वाहिनीवर