BAN vs IRE Mushfiqur Rahim: बांगलादेशची राजधानी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये संघ आयर्लंडविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या खेळाडूने मोठा इतिहास घडवला. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीलाच बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने ऐतिहासिक टप्पा गाठला.
आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने १ डाव आणि ४७ धावांनी विजय मिळवला. पहिला कसोटी सामना सिल्हेटमध्ये खेळवला गेला होता. तर दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला जात आहे.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळल्यानंतर मुशफिकुर रहीमने १०० कसोटी सामने पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. याआधी, कोणत्याही बांगलादेशी खेळाडूने १०० कसोटी सामने खेळण्याच्या जवळपासही पोहोचले नव्हते. रहीमनंतर मोमिनुल हक हा सर्वाधिक १०० कसोटी सामने खेळणारा बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. हकने ७५ कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले बांगलादेशी क्रिकेटपटू
मुशफिकर रहीम – १०० सामने
मोमिनुल हक – ७५ सामने
शाकिब अल हसन – ७१ सामने
तमीम इक्बाल – ७० सामने
मोहम्मद अश्रफुल – ६१ सामने
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी कर्णधार हबीबुल बशर यांनी मुशफिकुर रहीमला एक खास कसोटी कॅप दिली. माजी कर्णधार अक्रम खान यांनीही रहीमला स्मृतिचिन्ह प्रदान केलं. यानंतर, कर्णधार नझमुल हुसेन शांतोने रहीमला दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेल्या जर्सी भेट दिल्या.
या ऐतिहासिक प्रसंगी, रहीमने त्याच्या कुटुंबाचे, विशेषतः त्याच्या पत्नीचे आभार मानले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे सहकारी, प्रशिक्षक, त्याचा मित्रपरिवार आणि त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्याने बांगलादेश क्रिकेटला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणे संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. सामना खेळण्यासाठी आल्याबद्दल आयर्लंड क्रिकेट संघाचेही आभार मानले.
