नागपूर : गणेश सतीश (३९) आणि अक्षय कर्णेवारच्या (३५) सावध खेळीच्या जोरावर विदर्भाने मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत नागालँडवर ५ गडी राखून विजय नोंदवला. विशेष म्हणजे, गुरुवारी विदर्भाने अरुणाचल प्रदेशवर ९४ धावांनी पहिला विजय नोंदवला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामातील विदर्भाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला.

मुलापाडू येथील एसीए मैदानावर झालेल्या सामन्यात नागालँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. नागालँडने २० षटकांत ८ बाद ११५ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्याच षटकात सलामीवीर सिद्धेश वाठ अबू अहमदचा बळी ठरला. त्यानंतर मात्र अथर्व तायडे आणि गणेश सतीशने सावध फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. अथर्व २१ धावा काढून बाद झाला, तर गणेश सतीशने (३९) धावा काढल्या. अक्षय कर्णेवारने संयमी खेळी साकारत नाबाद ३५ धावांचे योगदान दिले. विदर्भाने १७.५ षटकात ५ गडी गमावून सहज विजय नोंदवला. तत्पूर्वी अरुणाचलची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर सेदाज अली १० धावांवर बाद झाला. कर्णधार आर. जोनॅथन (३५) आणि यष्टिरक्षक चेतन बिस्तने (४४) संयमी खेळी साकारत संघाचा धावफलक हालता ठेवला. एकूण २० षटकांत नागालँडने ८ गडी गमावून ११५ धावा केल्या. विदर्भाकडून यश ठाकूरने २ गडी बाद केले.