नवी दिल्ली : भारतात ॲथलेटिक्स प्रकारातील खेळाडूंची उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. तिहेरी उडी प्रकारात राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई करणारी शीना वर्की सोमवारी उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळली आहे. बंदी घातलेले औषध घेतल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्यावर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तातडीने शीना हिला निलंबित केले.
३२ वर्षीय शीनाने नेमके कोणते उत्तेजक घेतल्याचे, तसेच तिच्यावरील बंदीचा कालावधी जाहीर करण्यात आला नसला, तरी तिला निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताला भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या सूत्राने दुजोरा दिला.
शीना २०२३ हांगझू आशियाई स्पर्धेतही सहभागी झाली होती. उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शीनाने रौप्य, तर पाठोपाठ फेडरेशन करंडक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. आशियाई इनडोअर स्पर्धेत २०१८ मध्ये शीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
सातत्याने ॲथलेटिक्सपटू उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळत असल्याने भारताच्या प्रतिमेस धक्का बसत आहे. गेल्याच आठवड्यात थाळीफेक प्रकारातील गगनदीप सिंग दोषी आढळला होता. गगनदीपने आरोपाची कबुली दिली असून, त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
देशाच्या प्रतिमेला धक्का…
अलिकडच्या काळात भारताचे ॲथलेटिक्सपटू सातत्याने उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळत आहेत. त्यामुळे जागतिक क्रीडाक्षेत्रात देशाची प्रतीमा ढासळत आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या २०२३ मधील चाचणीच्या आकडेवारीनुसार, उत्तेजक प्रकरणात बंदी घातलेल्या भारतीय खेळाडूंची टक्केवारी ३.८ इतकी असून, ही चीन अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि रशियापेक्षा अधिक आहे. या सर्व देशांमधील टक्केवारी एक टक्का किंवा त्याहून कमी आहे. ‘वाडा’ने जाहीर केलेल्या अलीकडच्या आकडेवारीनुसार घेण्यात आलेल्या १२२३ चाचण्यांमधून सकारात्मक आढळलेल्या चाचण्यांत ६१ खेळाडू हे ॲथलेटिक्समधील आहेत.