जगातील दुसर्‍या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले, त्यामुळे तिला १५,००० डॉलर्सचा दंड बसला. या कारवाईनंतर ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. २३ वर्षीय ओसाका मानसिक आरोग्यामुळे माध्यमांशी बोलणे टाळत होती, असे समोर आले आहे.

ओसाका म्हणाली, “मी माघार घेते, कारण मला वाटते, की या स्पर्धेसाठी आणि इतरांसाठी ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इतर खेळाडू पॅरिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकतील. मी कधीही विचलित होऊ इच्छित नाही. माझी वेळ चांगली नव्हती आणि माझा संदेश अधिक स्पष्ट होऊ शकला असता. महत्त्वाचे म्हणजे मी कधीही मानसिक आरोग्यास तुच्छ मानणार नाही.”

 

ओसाकाने पत्रकार परिषदेत हजेरी न लावल्याबद्दल पत्रकारांची माफी मागितली असली तरी ती पूर्णपणे तिचा वैयक्तिक निर्णय होता असेही ती म्हणाली. नैसर्गिक वक्ता नसल्यामुळे ती माध्यमांसमोर उभी राहू शकत नाही. कधीकधी ती घाबरून जाते आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तम उत्तर शोधण्यात तिला त्रास होतो.

हेही वाचा – भारताच्या ‘वर्ल्डकपविजेत्या’ क्रिकेटपटूनं घेतली २८व्या वर्षी निवृत्ती!

ओसाका सध्या टेनिसमधून ब्रेक घेत आहे, पण हा ब्रेक किती काळासाठी असेल हे तिने सांगितले नाही. ओसाका म्हणाली, ”मी आता काही काळ कोर्टापासून दूर राहील. परंतु जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मला खरोखर टूरसोबत काम करण्याची इच्छा आहे. आशा आहे की आपण सर्वजण निरोगी व सुरक्षित राहाल. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि तुम्हाला लवकरच भेटेन.”

फ्रेंच ओपनमध्ये ओसाकाने शानदार सुरुवात केली आणि रोमानियाच्या पेट्रिशिया मारिया टिगचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. चार वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या ओसाकाने १ तास ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६३व्या क्रमांकावर असलेल्या पेट्रीशियाला ६-४, ७-६ (४) असे पराभूत केले.