सहसा महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे मल्ल राष्ट्रीय अजिंक्यपद किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. कारण त्यांना भीती असते, की आपण महाराष्ट्राबाहेर हरलो तर आपली केसरीपदाची शान जाईल व आपली पतही गमावली जाईल. नरसिंग हा मुलखावेगळाच मल्ल. त्याने केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेरही चमक दाखवू शकतो हे सिद्ध केले आहे.
जागतिक कुस्ती स्पर्धेत नरसिंगने कांस्यपदक मिळवत आपल्या देशाची लाज राखली. त्याचा अपवाद वगळता एकही मल्ल यंदा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. पदकाचा दावेदार असलेल्या योगेश्वर दत्त याला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे स्पर्धेतूनच ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे भारतीय कुस्ती संघटकांची मान खाली गेली होती. नरसिंगने काही अंशी देशाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कांस्यपदकामुळे भारताला रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्की टाळण्यात यश मिळाले. नरसिंगने या कांस्यपदकाबरोबरच आगामी ऑलिम्पिकसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे.
नरसिंगच्या पदकाने कुस्ती संघटकांपुढे नवीनच समस्या निर्माण झाली आहे. त्याने मिळवून दिलेला कोटा हा देशासाठी असल्यामुळे त्यावर तो हक्क सांगू शकत नाही. त्या वजनी गटात कोणत्या मल्लाला स्थान द्यायचे याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घ्यावयाचा असतो. नरसिंगने ७४ किलो गटात ही संधी प्राप्त करून दिली आहे. एरवी सुशीलकुमार हा त्या गटात भाग घेत असतो. सुशीलने २००८ मध्ये ६६ किलो गटात ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविले होते. २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने याच वजनी गटात रौप्यपदक पटकाविले. लागोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. या ऑलिम्पिकनंतर सुशीलने ७४ किलो गटात भाग घेण्यास सुरुवात केली. गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने या वजनी गटात भाग घेतला व सोनेरी कामगिरी केली.
सुशीलची ऑलिम्पिक व अन्य स्पर्धामधील आजपर्यंतची कामगिरी पाहता त्याचे नरसिंगपेक्षा पारडे जड आहे, असे असले तरी गेल्या वर्षभरात त्याला अनेक वेळा शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. तो ३२ वर्षांचा असून ऑलिम्पिकमधील अन्य स्पर्धकांचा विचार करता त्याचे वय प्रौढत्वाकडे झुकलेले आहे. तंदुरुस्तीच्या समस्येमुळेच त्याने जागतिक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नरसिंगला जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. नरसिंगने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले होते. मात्र पहिल्याच फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले होते. हे अपयशच आगामी ऑलिम्पिकच्या प्रवेशाबाबत अडथळा ठरण्याची शक्यता आहे. मात्र सुशीलच्या तुलनेत तो सहा वर्षांनी तरुण आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. वयाचा व तंदुरुस्तीचा विचार केल्यास सुशीलपेक्षा त्याची बाजू वरचढ आहे. जागतिक स्पर्धेत त्याने पदक मिळविले नसते तर आपल्या देशाची मान आणखीनच खाली गेली असती. या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नरसिंगने ‘महाराष्ट्र केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब दोनदा जिंकला आहे. हे यश मिळविताना त्याने आपल्यापेक्षा वजनाने भारी असलेल्या मल्लांना चारीमुंडय़ा चीत केले आहे.
भारतीय संघाची निवड करण्यासाठी चाचणी स्पर्धा घेतल्या जातात. मात्र अनेक वेळा या चाचणी स्पर्धा म्हणजे देखावा असतो. १९८४ च्या ऑलिम्पिकसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत महाराष्ट्राच्या रामचंद्र सारंग या मल्लाने विजय मिळविला होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्याऐवजी उत्तर विभागातील मल्लाचीच वर्णी ऑलिम्पिकसाठी लागली होती. अर्थात नरसिंग हा महाराष्ट्रात राहत असला, तरी तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. ही त्याच्यासाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. सुशीलबरोबरच नरसिंग या गुणवान खेळाडूला ऑलिम्पिकची संधी द्यायची असेल, तर या दोन्ही मल्लांना वेगवेगळ्या गटात स्थान द्यावे लागेल व आतापासूनच त्यांना त्या गटासाठी तयारी करावी लागेल. हे लक्षात घेता नरसिंगची घरच्या आखाडय़ात खरी कसोटी आहे.
milind.dhamdhere@expressindia.com