देशातील उदयोन्मुख क्रीडापटूंना कौशल्य दाखविण्याची संधी देणारे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. यंदा गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. पदक तालिकेत महाराष्ट्राने सेना दलानंतरचे दुसरे स्थान मिळवले जरी असले तरी एकूण पदकांच्या संख्येत महाराष्ट्राने सेना दलास मागे टाकले आहे. निखिल दुबे याने ७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आणि मुष्टीयुद्धात ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राची सोनेरी सांगता केली. १९९४ नंतर प्रथमच महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले “२७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं गुजरातमध्ये आयोजन झालं होतं. या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक एकूण १४० पदकं मिळालेली आहेत. पदक तालिकेत सेना दलानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. २०१५ मध्ये जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा आपला चौथा क्रमांक होता. मला वाटतं पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला एवढे मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. याचसोबत क्रीडा प्रशिक्षकांचंही मी अभिनंदन करतो. ”
कोणाला किती पदकं मिळाली? –
महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण १४० पदकांमध्ये ३० सुवर्ण, ३० रौप्य आणि ६३ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर सेना दलास एकूण १२८ पदकं मिळाली असून त्यामध्ये ६१ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३२ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या नंतर पदक तालिकेत हरियाणा राज्याचा क्रमांक लागला आहे. हरियाणाला एकूण ११६ पदकं मिळवता आली. ज्यामध्ये ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. सेना दलास सलग चौथ्यांदा अव्वल स्थान मिळालेले आहे.
सात वर्षांच्या खंडानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन –
महाराष्ट्राच्या या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर गुजरात राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. यापूर्वी केरळ येथे २०१५ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती. गुजरात राज्यात अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर अशा सहा ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३६ क्रीडा प्रकारांत तब्बल सात हजार खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करुन सर्वांचीच मने जिंकली. यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे यश ठळकपणे झळकते.
एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश –
पदक तालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या सेना दल आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरियाणा यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १४० पदकांची कमाई करुन ही स्पर्धा गाजवली. आधुनिक सुविधा, खेळाडूंसाठी असलेले विविध सुविधा आणि ऑलिम्पिकपटू, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या सेना दल आणि हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या हौशी खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य आणि मिळवलेले घवघवीत यश हे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भारतात बलवान आहे हे दर्शवतो. पदक तालिकेत महाराष्ट्र संघ दुसऱ्या स्थानावर दिसत असला तरी महाराष्ट्राने सर्वाधिक १४० पदकांची कमाई करुन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यातील जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकलेली आहेत हे विशेष.