राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा
भारतीय शालेय क्रीडा महासंघटनेतर्फे पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांची लयलूट करत दुसरे स्थान पटकावले.
गेल्या आठवडय़ात झालेल्या या तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि १२ कांस्यपदकांना गवसणी घातली होती. मुलांमध्ये अभय शिंदेने सुवर्णपदकाची कमाई केली, तर वैयक्तिक साबरे प्रकारात जय खांडेलवाल याने रौप्यपदक पटकावले.
साबरे सांघिक प्रकारात अभय शिंदे, प्रथमेश तुपे, प्रीतम हल्दर आणि शिवम सुब्रह्मण्यम यांनी सुवर्णपदक जिंकले. फॉइल प्रकारात जय खांडेलवाल, जयदीप पांढरे, प्रीतम देशमुख आणि भुनेश नागोसे यांनी कांस्यपदक मिळवले. तर ईप्पी प्रकारात महेश कोराडे, आदित्य राठोड, तनिष्क सूर्यवंशी आणि अभिषेक देशमुख यांनी कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये फॉइल प्रकारात अनन्या जोशी, खुशी दुतोंडे, प्रीती टकले आणि विशाखा काजळे यांनी कांस्यपदकाची कमाई केली.