भारतीय संघ सध्या पराभवांच्या मालिकांमधून जात असला तरी त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे आणि आगामी विश्वचषक भारतातच राहील, अशी मला आशा आहे. पण सध्याच्या घडीला त्यांना पाठिंब्याची गरज आहे, असे मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. सचिनच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले, याप्रसंगी सचिन बोलत होता. या नाण्यावर सचिनची मुद्रा असून त्यांचे नाव आणि स्वाक्षरीही आहे.‘‘भारतीय संघात गुणवान खेळाडू आहेत, यामध्ये कुठलीच शंका नाही. त्यामुळे आगामी विश्वचषकात दमदार कामगिरी करून ते विश्वविजेतेपद कायम ठेवतील, अशी मला आशा आहे. पण सध्याच्या घडीला संघ वाईट परिस्थितीतून जात असून त्यांना या घडीला पाठिंब्याची गरज आहे. या वेळी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते नक्कीच गतवैभव पुन्हा मिळवून देतील,’’ असे सचिनने सांगितले.