वृत्तसंस्था, टोक्यो

तब्बल २५६६ दिवसांनी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला एखाद्या स्पर्धेत अव्वल तिघांमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. नीरज सात वर्षांहूनही अधिक काळ सातत्य टिकवून होता. मात्र, आता सातत्यासह त्याने जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतील जेतेपदही गमावले. यंदा टोक्यो येथे झालेल्या या स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी राहिला. भारताचा अन्य भालाफेकपटू सचिन यादवने सरस कामगिरी करताना चौथे स्थान मिळवत उज्ज्वल भविष्याच्या आशा निर्माण केल्या.

नीरजने २०२१ मध्ये ज्या ठिकाणी ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली होती, त्याच टोक्योमध्ये यंदा जागतिक स्पर्धेत तो यश मिळवू शकला नाही. गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत एकही भालाफेकपटू ९० मी.चे अंतर पार करू शकला नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने ८८.१६ मीटरच्या कामगिरीसह सोनेरी यश संपादन केले. वॉलकॉट २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेताही आहे. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स (८७.३८ मीटर) आणि अमेरिकेचा कर्टीस थॉम्पसन (८६.६७ मीटर) हे अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाचे मानकरी ठरले.

सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदककमाई करणारा, शिवाय जागतिक स्पर्धेतील गतविजेत्या नीरजने निराशा केली. त्याने ८३.६५ मीटरसह सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८४.०८ मीटरचे अंतर गाठले. ही त्याची सर्वोत्तम फेक ठरली. तिसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने ‘फाऊल’ केला, तर चौथ्या प्रयत्नात ८२.८६ मीटरची फेक केली. परंतु या ‘साधारण’ कामगिरीमुळे तो गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरला. गुणतालिकेतील अव्वल सहा भालाफेकपटूंनाच अखेरचा सहावा प्रयत्न मिळाला. नीरज आपल्या एकाही प्रयत्नात ८५ मीटरच्या जवळपास पोहचू शकला नाही.

याउलट, भारताचा अन्य भालाफेकपटू सचिन यादवने तीन वेळा ८५ मीटरचे अंतर पार केले. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटरचे अंतर गाठले. ही त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या कामगिरीसह तो सुरुवातीला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानीही आला होता. मात्र, अन्य भालाफेकपटूंनी हळूहळू त्याला मागे सोडण्यास सुरुवात केली. सचिनचा दुसरा प्रयत्न ‘फाऊल’ ठरल्यानंतर पुढील चार प्रयत्नांत त्याने अनुक्रमे ८५.७१, ८४.९०, ८५.९६ आणि ८०.९५ मीटरची कामगिरी केली. त्यामुळे १२ जणांच्या अंतिम फेरीत सचिन चौथ्या स्थानी राहिला.

क्रिकेटकडून भालाफेकीकडे

उत्तर प्रदेशच्या सचिन यादवने अन्य बहुतांश युवा भारतीयांप्रमाणेच क्रिकेटपटू होण्याचे, त्यातही वेगवान गोलंदाजी करण्याचे स्वप्न बाळगले होते. परंतु वयाच्या १९व्या वर्षी तो भालाफेकीकडे वळला. सहा फूट पाच इंच उंची असलेल्या सचिनने यंदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक, तर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८४.३९ मीटरचे अंतर गाठले होते आणि ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. परंतु आता २५ वर्षीय सचिनने जागतिक स्पर्धेत ८६.२७ मीटरची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना चौथे स्थान मिळवले. अलीकडेच झालेल्या ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेत सचिन चौथ्या स्थानीच राहिला होता.

शरीरावर अतिरिक्त ताण

चौथ्या प्रयत्नानंतर नीरज आठव्या स्थानी होता. त्याला पाचवा प्रयत्न करण्याची संधी मिळाली. परंतु त्यातही तो अपयशी ठरला. त्यामुळे सहाव्या प्रयत्नापूर्वीच तो स्पर्धेबाहेर झाला. पाचव्या प्रयत्नाच्या वेळी नीरजने स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. त्याने धावण्याचा वेग वाढवला आणि भाला फेकताना पूर्ण जोर लावला. मात्र, यामुळे त्याच्या शरीरावर अतिरिक्त ताण आला. भाला सोडल्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि अंतिम रेषेच्या बाहेर गेला. त्यामुळे त्याचा प्रयत्न ‘फाऊल’ ठरला. त्यानंतर त्याने त्वरित पोटाला बांधलेला पट्टा काढला. या वेळी बऱ्याच वेदना होत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आले.

ऑलिम्पिक, डायमंड लीग विजेत्यांपेक्षा सचिन सरस

सचिन यादवने (८६.२७ मीटर) जागतिक स्पर्धेत चमक दाखवताना नीरज चोप्रा (८४.०८) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (८२.७५) या ऑलिम्पिक विजेत्यांसह डायमंड लीग विजेत्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरपेक्षाही (८६.११) सरस कामगिरी केली. गतवर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा अर्शद नदीम जागतिक स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला. एकूण १२ जणांच्या अंतिम फेरीत तो दहाव्या स्थानी राहिला.