स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या टी-२० ट्राय सिरीज २०२५ मध्ये एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांमध्ये १६ जून रोजी टी-२० सामना खेळवला गेला. २० षटकं झाल्यानंतर हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. १-२ नव्हे तब्बल ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर या सामन्याचा विजेता संघ मिळाला.
क्रिकेट इतिहासातील हा पहिला टी-२० सामना ठरला, ज्यामध्ये तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. हा रोमांचक सामना टिटवुड मैदानावर खेळवण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २० षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. नेपाळच्या फिरकीपटूंनी, विशेषतः संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत नेदरलँड्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यामुळे नेदरलँड्सने नेपाळला विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य दिले. संदीप लामिछनेने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये १८ धावा देत ३ विकेट घेतले. तेजा निदामानुरू नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
प्रत्युत्तरात नेपाळ संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या आणि त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. कुशल भुर्तेल (३४) आणि रोहित पौडेल (४८) यांनी चांगली फलंदाजी केली. नंदन यादवने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत आणला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
सुपर ओव्हरचा ड्रामा
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने १९ धावा केल्या. पण नेदरलँड्सनेही प्रत्युत्तरात १९ धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्येही धावसंख्या बरोबरीत आणली. यानंतर, दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, जिथे दोन्ही संघांनी पुन्हा १७-१७ अशा समान धावा केल्या, ज्यामुळे दुसरी सुपर ओव्हरही टाय झाली. दोन सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
सामना तिसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. पण तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळ संघाला आपले खाते उघडता आले नाही आणि त्यांनी दोन्ही विकेट गमावल्या. यानंतर, नेदरलँड्सने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला.
या सामन्यात नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरूने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ धावांचे योगदान दिले. विक्रमजीत सिंगने ३० धावांची खेळी केली. शकिब झुल्फिकारनेही २५ धावा केल्या. दुसरीकडे, गोलंदाजीत डॅनियल डोराम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत १४ धावा देत ३ विकेट घेतले. विक्रमजीत सिंगनेही २ फलंदाजांना बाद केले. जॅक लिऑन-कॅचेट, बेन फ्लेचर आणि काइल क्लेन यांना १-१ विकेट घेण्यात यश आले.