उत्कंठापूर्ण लढतीत पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमधील (तिसरी फेरी) पुरुष गटात यजमान नेदरलँड्सकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सने ही लढत जिंकून न्यूझीलंडसह चार गुणांनिशी अव्वल स्थान पटकावले आहे.  
सामन्याच्या सुरुवातीपासून नेदरलँड्सने खेळावर नियंत्रण मिळविले. बिली बाकेरने भारताची बचावफळी भेदून नेदरलँड्सचे खाते खोलले. सुरुवातीलाच पहिल्या गोल झळकावल्यानंतर नेदरलँड्सच्या आक्रमणाला धार आली. २०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचा फायदा घेत जेरॉन हर्ट्सबर्गरने अचूक गोल करत नेदरलँड्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंना सूर गवसला. मात्र गोल करण्याच्या अनेक संधी मिळूनही त्याचा फायदा भारताला उठवता आला नाही. त्यामुळेच भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.