एकदिवसीय क्रिकेट जनमानसात रुजले ते १९७५च्या विश्वचषकापासून. दर चार वर्षांनी होणाऱ्या क्रिकेटच्या महायुद्धाद्वारे जगज्जेता ठरतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या विश्वचषक अध्यायाला २००७मध्ये प्रारंभ झाला. झटपट क्रिकेटची जादू लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे दर दोन वर्षांनी ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारातील विश्वविजेता ठरतो. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अनपेक्षित विजयाचा पराक्रम दाखवला होता. त्या विजयानंतर मुंबईत निलांबरी बसमधून भारतीय संघाची संस्मरणीय मिरवणूक काढण्यात आली होती. तो जल्लोष, उन्माद आणि यशाचा रुबाब आजही समस्त भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
२००७मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पध्रेने अनेक रोमहर्षक क्षणांची अनुभूती दिली. भारत-पाकिस्तान सामन्याची चित्तथरारक रंजकता तर दोनदा क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. साखळीतील ‘टाय’ लढतीत बोल आउटची थरारकता भारतासाठी निर्णायक ठरली, तर अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माचे षटक भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारे ठरले. या स्पध्रेत १० षटकारांसह ख्रिस गेलने ट्वेन्टी-२०मधील पहिले शतक साकारले आणि युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार खेचण्याचा भीमपराक्रम केला. पहिल्या विश्वचषक स्पध्रेतील गटसाखळीमध्ये १२ संघ चार गटांत विभागले होते. त्यानंतर ‘सुपर एट’मध्ये आठ संघांचा समावेश होता.
२००९मध्ये इंग्लंडला झालेल्या ट्वेन्टी-२०च्या दुसऱ्या अध्यायावर पाकिस्तान या आशियाई राष्ट्राचेच वर्चस्व दिसून आले. या स्पध्रेतही १२ संघांनी भाग घेतला होता. परंतु राजनैतिक कारणास्तव झिम्बाब्वेने माघार घेतल्यामुळे अन्य एका राष्ट्राला संधी मिळाली. साखळी फेरीत अ-गटातून बांगलादेशचा पत्ता कट झाला, तर ‘ग्रुप ऑफ डेथ’ गणल्या जाणाऱ्या क-गटातून चक्क ऑस्ट्रेलियाचेच आव्हान संपुष्टात आले. ‘सुपर-एट’मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारत यांचा एका गटात, तर श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आर्यलडचा दुसऱ्या गटात समावेश झाला. विश्वविजेत्या भारताला ‘सुपर-एट’चा एकही सामना न जिंकता आल्याने रिक्त हस्ते माघारी परतावे लागले. उपांत्य फेरीत शाहीद आफ्रिदीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर श्रीलंकेने वेस्ट इंडिजला सहज हरवले. तिलकरत्ने दिलशान लंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ‘पाकिस्तान झिंदाबाद, बूम बूम आफ्रिदी’ या नाऱ्यासह पाकिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ८ विकेट राखून पराभव आणि जेतेपद पटकावले. हा विश्वचषक पाकिस्तानच्या झुंजार वृत्तीसाठी आणि आफ्रिदीसाठी स्मरणात राहतो.
२०१०मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाने इंग्लंडला प्रथमच विश्वविजेतेपदाचा मान मिळवून दिला. २००८मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आयसीसीचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आणि फक्त दहा महिन्यांच्या अवधीतच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा घ्यावी लागली. १२ राष्ट्रांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेत प्रथमच आशियाई राष्ट्रांची मक्तेदारी झुगारण्यात आली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकणार आणि इंग्लंड हरणार अशीच चर्चा होती. परंतु जे मैदानावर घडले ते चमत्कारिकच होते. पॉल कॉलिंगवूड या इंग्लिश कप्तानाने हा सुवर्णाध्याय लिहिण्याची किमया साधली. पण मालिकावीर केव्हिन पीटरसन या अध्यायाचा खराखुरा शिल्पकार होता. या स्पध्रेत ट्वेन्टी-२०मधील भारताचे पहिले शतक सुरेश रैनाने नोंदवले. पावसामुळे या स्पध्रेतील काही सामन्यांचे नुकसान झाले. ‘सुपर-एट’मध्ये एका गटात इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि द. आफ्रिकेचा तर दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि भारताचा समावेश होता. भारतीय संघ पुन्हा अपयशी ठरला. पहिल्या उपांत्य सामन्यत इंग्लंडने श्रीलंकेला हरवले, तर दुसरा उपांत्य सामना विलक्षण रंगतदार ठरला. माइक हसीने ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

२०१२मध्ये श्रीलंकेत झालेल्या चौथ्या विश्वचषक स्पध्रेत वेस्ट इंडिजने यजमानांनाच पराभूत करीत तब्बल ३३ वर्षांनी जगज्जेतेपद कॅरेबियन बेटांवर नेले. पाच वर्षांत चौथ्यांदा श्रीलंकेचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले होते. अंतिम सामन्यात विंडीजने श्रीलंकेवर ३६ धावांनी आरामात विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या संघाला गटसाखळीमध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. आर्यलडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना एकेक गुणाला मिळाला. त्यानंतर सरासरीच्या बळावर हा संघ ‘सुपर-एट’मध्ये पोहोचला. याच सरासरीच्या गणिताने भारताचा घात केला. सुपर एटमधील दुसऱ्या गटातील ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या प्रत्येकाच्या खात्यावर दोन विजयांसह ४ गुण जमा होते. पण गणित चुकले आणि भारताचा मार्ग सीमित राहिला. सुपर-एटमधील दुसऱ्या गटात श्रीलंका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचा समावेश होता. श्रीलंकेचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिलाच सामना टाय झाला, मग सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने तो जिंकला. मग वेस्ट इंडिजनेही न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्येच पराभवाचा दणका दिला. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले. पहिल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानला हरवले, तर विंडीजने बलाढय़ ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मग अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने कॅलिप्सोच्या ठेक्यावर जल्लोषमय आनंद साजरा केला.
ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेची परिसीमा. यात विजयाचे पारडे क्षणार्धात कोणत्या संघाकडे झुकेल, हे सांगणे अवघड. ट्वेन्टी-२० विश्वचषकावर आतापर्यंत अनुक्रमे भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी नाव कोरले आहे. प्रत्येक स्पध्रेत नवा जगज्जेता देणाऱ्या या स्पध्रेत त्यामुळेच यंदाचा विजेता कोण होईल, हे सांगणे अवघड आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या चार विश्वचषक स्पध्रेतील सर्व संघांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास आशियाई वर्चस्व अधोरेखित होते, तर जेतेपदाची सर्वाधिक संधी श्रीलंकेला असल्यचे स्पष्ट होते. २५ सामन्यांपैकी १६ विजय मिळवणाऱ्या लंकेची टक्केवारी सर्वाधिक ६६ टक्के आहे. याचप्रमाणे २००९ आणि २०१२मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या श्रीलंकेला दोन्ही खेपेस जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो ६१.९० टक्के यशस्वी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा. त्यांनी २१ पैकी १३ सामने जिंकले आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकात सर्वाधिक २६ सामने खेळणाऱ्या पाकिस्तानचा क्रमांक तिसरा लागतो. त्यांची १६ विजयांसह एकंदर यशाची टक्केवारी ६३.४६ टक्के आहे. मग चौथा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा (२१ सामन्यांत १३ विजय = ६१.९०%) आणि पाचवा क्रमांक भारताचा लागतो. भारताने जिंकलेल्या १२ सामन्यांपैकी चार विजय हे २००७च्या पहिल्या जगज्जेतेपदाच्या वाटचालीतील, तर चार विजय २०१२च्या विश्वचषक स्पध्रेतील. २००९ आणि २०१०च्या विश्वचषक स्पर्धामध्ये भारताने साखळीमध्ये दोन विजयांनिशी चांगली सुरुवात केली होती. मात्र दोन्ही वेळेला सुपर-८मधील तिन्ही सामन्यांत पाटी कोरी राखल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. पाचवी विश्वचषक स्पर्धा आशियाई खंडातच बांगलादेशमध्ये येत्या रविवारपासून सुरू होत आहे. आशियाई वर्चस्वाचा झेंडा पुन्हा फडकेल की नवा जगज्जेता उदयास येईल, हे त्यानंतर ६ एप्रिलला मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याद्वारे स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New team may win t20 world cup
First published on: 13-03-2014 at 12:20 IST