न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन गेल्या १५ महिन्यांपासून कोपराच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीने तो इतका कंटाळला आहे, की अनेकवेळा त्याने हात कापण्याचा विचारही मनात आल्याचे सांगितले. न्यूझीलंडने १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी नुकताच १५ जणांचा संघ जाहीर केला. कोपराच्या दुखापतीमुळे विल्यमसनला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला अजून काही आठवडे लागतील. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाचा कर्णधार असेल.
अशा स्थितीत आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघालाही केन विल्यमसनच्या दुखापतीची चिंता सतावणार आहे. कारण आयपीएल २०२२मध्ये तो हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. फ्रेंचायझीने विल्यमसनला १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
हेही वाचा – IND vs WI : अरेरे..! विराट कोहलीनं बनवला लाजिरवाणा रेकॉर्ड; कारकिर्दीत दुसऱ्यांदाच केली ‘ही’ गोष्ट!
विल्यमसन म्हणाला, “अनेक वेळा माझ्या मनात विचार आला, की करवतीने आपला डावा हात कापावा. या प्रकारच्या दुखापतीची प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. त्यामुळे माझ्या कोपराच्या दुखापतीबाबत मी आशावादी होतो. पण तसे झाले नाही आणि खरे सांगायचे तर ते पचवणे मला कठीण जात आहे. मला डोके हलवतानाही त्रास होत आहे. पण मला न्यूझीलंड क्रिकेट आणि वैद्यकीय संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. पण एक खेळाडू म्हणून दुखापतीतून सावरणे सोपे नाही.”
३१ वर्षीय विल्यमसनने या दुखापतीतून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि सचिन तेंडुलकर यांचा सल्लाही मागितला आहे.