विशाखापट्टणम : इंग्लंडच्या संघाने यापूर्वीच महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे आज, रविवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांच्या फलंदाजांकडून अपेक्षा असेल.
इंग्लंडने एकूण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, काही सामन्यांत त्यांच्या फलंदाजांना प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे उपांत्य फेरीपूर्वी संघासाठी हा चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर बांगलादेश व पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना संघर्ष करावा लागला. एमी जोन्स आणि मध्यक्रमातील फलंदाज सोफिया डंकलीसारख्या खेळाडूंना प्रभाव पाडता आलेला नाही. तर, कर्णधार नॅट स्किव्हर-ब्रंट आणि टॅमी ब्यूमोंट यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. हीथर नाइटने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगल्या खेळी केल्या.
भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न स्पर्धेचा शेवट विजयाने करण्याचा राहील. न्यूझीलंडला सांघिक स्तरावर प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांच्या आघाडीच्या व तळाच्या फलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. कर्णधार सोफी डिवाइनने संघासाठी धावा केल्या.
वेळ : सकाळी ११ वा. थेट
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, जिओहॉटस्टार ॲप.
