वृद्धिमान साहाकडून स्पष्टीकरण
भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाचे फलंदाजीचे स्थान हे नेहमीच अनिश्चित असते. भारताच्या फलंदाजीच्या फळीतील सहावे स्थान हे परिस्थितीनुरूप लवचीक असते, असे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०हून अधिक सरासरी राखणाऱ्या आणि तीन कसोटी शतके झळकावणाऱ्या साहाने सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन डावांत साहा अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या क्रमांकाला न्याय देणे आव्हानात्मक ठरले का, या प्रश्नाला उत्तर देताना साहा म्हणाला, ‘‘सातव्या क्रमांकावर मी नेहमी फलंदाजी करीत नाही. मी सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या क्षमतेनुसार मी, अश्विन आणि जडेजा यांचे फलंदाजीचे स्थान बदलले जाते.’’
सलामीच्या स्थानावर मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्यापैकी दोघे जण फलंदाजी करतात. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे असे पहिले पाच क्रमांक ठरतात. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर त्याचे सहावे स्थान अद्याप रिक्त आहे. तळाच्या फलंदाजांसोबत दुसऱ्या नव्या चेंडूनिशी खेळणे आणि आघाडीची फळी कोसळली, तर डाव सावरणे हे आव्हान या स्थानाचे असते.
‘‘खेळपट्टीच्या स्वरूपानुसार ६, ७ आणि ८ हे स्थान ठरते. संघव्यवस्थापनाच्या रणनीतीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करायची माझी तयारी आहे,’’ असे साहाने स्पष्ट केले.
आणखी काही षटके मिळाली असती, तर पहिली कसोटी भारताला जिंकता आली असती, असे लोकेश राहुलप्रमाणेच मत साहाने प्रकट केले. २३१ धावांचे आव्हान पेलताना श्रीलंकेची ७ बाद ७६ अशी अवस्था झाली होती. परंतु अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि तो अनिर्णीत राहिला.
‘‘पहिल्या कसोटीत भारताची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या डावात आमची फलंदाजी चांगली झाली होती. शिखर, राहुल आणि विराट यांनी समाधानकारक धावा केल्या होत्या. कोणत्याही संघाचे ७ फलंदाज १०० धावांच्या आत तंबूत परततात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खचणे स्वाभाविक असते,’’ असे साहाने सांगितले.
पहिल्या कसोटीबाबत साहा म्हणाला, ‘‘आम्ही पहिली कसोटी जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. पहिले काही निर्णय झटपट लागले असते, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. आम्ही सुरुवातीला कसोटी वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र नंतर ती जिंकू शकतो अशा आशा निर्माण झाल्या.’’
दुसऱ्या कसोटीतसुद्धा भारत पाच विशेषज्ञ गोलंदाजांसह उतरणार आहे. याबाबत साहा म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी मिळवणे, हे कसोटी सामना जिंकण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे गोलंदाज हे अधिक महत्त्वाचे असतात. याशिवाय माझ्यासहित जडेजा आणि अश्विनवर फलंदाजीचीही जबाबदारी असते.’’