Team India ODI Captain: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. याआधी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही रामराम केला होता. त्यामुळे तो आता भारतीय संघासाठी केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. रोहित २०२७ चा वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, तो २०२७ पर्यंत संघात कायम राहणार की नाही, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. या चर्चा सुरू असताना भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळी युवा फलंदाज शुबमन गिलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आला होती. त्यावेळी असा अंदाज वर्तवला गेला होता की, रोहितनंतर शुबमन गिल भारतीय वनडे संघाचा कर्णधार असेल. मात्र, आता रोहितनंतर श्रेयस अय्यर भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनणार असल्याची चर्चा रंगायला सुरू झाली आहे. हे सर्व रोहित काय निर्णय घेतो यावर अवलंबून असणार आहे. आगामी २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. दरम्यान जर रोहितने त्याआधीच वनडे क्रिकेटला रामराम केलं, तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मालिकेत श्रेयसकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. तर आशिया चषकाआधी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील गिलकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत बीसीसीआयने तिन्ही फॉरमॅटमध्ये एका कर्णधाराची योजना राबवली आहे. पण गिलवर येणारा दबाव पाहता, हा निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. श्रेयसने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली, असं असतानाही त्याला संघात स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान त्याची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील कामगिरी पाहता, त्याला वनडे संघात स्थान दिले जाऊ शकते.