Rachin Ravindra Injury: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. मात्र या मालिकेला सुरुवात होण्याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. मंगळवारी (३० सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे खेळाडू माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर सराव करत होते. सरावादरम्यान सीमारेषेजवळील बोर्डला रचिन रवींद्र जोरदार धडकला. ही टक्कर इतकी भीषण होती की त्याला टाके घालावे लागणार आहेत.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वाल्टर आणि रॉब वॉल्टर यांनी रचिन रवींद्रच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. ते म्हणाले, “रचिन रवींद्र टी-२० मालिकेतून बाहेर झाल्यामुळे आम्ही सर्व खूप निराश आहोत. त्याच्या ओठांच्या वरच्या बाजूला आणि नाकाच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला टाके घालावे लागले आहेत. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ लागणार आहे. रचिन आमच्या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. पण त्याची फिटनेस आणि सुरक्षितता हीच आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. येत्या २ आठवड्यात तो इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेआधी पूर्णपणे फिट व्हावा यासाठी त्याला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून रचिन रवींद्र बाहेर होणं, हा न्यूझीलंड संघासाठी सर्वात मोठा धक्का आहे. कारण गेल्या ५ डावात त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या ५ डावात ६९,३०, ३, ६३ आणि ४७ झावा केल्या आहेत. ही आकडेवारी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी आहे. पण रचिन रवींद्र मालिकेतून बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना देखील दिलासा मिळाला असेल. रचिन रवींद्रआधी मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स , विल ओ रूक, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्यूसन आणि केन विलियम्सन हे आधीच न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतून बाहेर पडले आहेत.
या मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ:
टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), डेव्होन कॉनवे, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जॅकब्स, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), काइल जेम्सन, इश सोडी, मॅट हेनरी, जेकब डफी, झाकारी फोल्क्स, जेम्स नीशम, बेन सियर्स.