Argentina Team In India: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान त्याच्या भारत दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. लिओनेल मेस्सीचा संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात फ्रेंडली सामना खेळण्यासाठी केरळमध्ये दाखल होणार आहे. अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनने शनिवारी (२३ ऑगस्ट) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, “लिओनेल स्कोलोनीच्या नेतृत्वात अर्जेंटीनाचा राष्ट्रीय संघ २०२५ मध्ये २ फिफा फ्रेंडली सामने खेळणार आहे. पहिला सामना ६ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान युएसए संघाविरूद्ध खेळला जाईल. तर दुसरा १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान अंगोलातील लुआंडामध्ये आणि भारतातील केरळमध्ये खेळवला जाणार आहे.”

अर्जेंटीना संघाला फिफा वर्ल्डकप जिंकण्यासाठी बरेच वर्ष वाट पाहावी लागली होती. यादरम्यान त्यांना केरळकडूनही चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे अर्जेंटीनाने फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर केरळचेही आभार मानले होते. २०२२ फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन कतारमध्ये केले गेले होते. या स्पर्धेत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने बाजी मारत १९८६ नंतर पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर १८ डिसेंबर २०२२ ला वर्ल्डकपविजेत्या अर्जेंटीना संघाकडून एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यात त्यांनी बांगलादेश, पाकिस्तान, भारत आणि केरळचे आभार मानले होते.

अर्जेंटीनाचा संघ केरळ दौऱ्यावर येणार हे तर स्पष्ट झालं आहे. पण मेस्सी या दौऱ्यावर येणार की नाही, याबाबत अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. अर्जेंटीनाचा संघ केरळमध्ये २ फ्रेंडली सामने खेळणार आहे. या सामन्याचे आयोजन तिरूवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये केले जाणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले होते की, मेस्सी डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. १२ डिसेंबरपासून तो भारतातील ४ शहरात दौरा करणार आहे. तो कोलकाताहून अहमदाबाद मग मुंबई आणि शेवटी दिल्लीला जाणार आहे. मेस्सी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०११ मध्ये तो भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी तो वेनेजुएलाविरूद्ध फ्रेंडली सामना खेळण्यासाठी मैदानात देखील उतरला होता.