मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्यासह पदाधिकाऱ्यांनाही भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत फार मोठी झेप घेऊ शकत नाही, असे वाटते. पण भारताचे उच्च कामगिरी संचालक रोएलन्ट ओल्टमन्स यांच्या मते, अखेरच्या क्षणी गोल स्वीकारण्याच्या वृत्तीवर मात केल्यास भारतीय संघ या स्पर्धेत आश्चर्यकारक निकाल देऊ शकतो.
हेग, नेदरलँड्स येथे ३१ मेपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत हॉकी इंडिया आणि वॉल्श यांनी भारतीय संघ अव्वल आठ जणांमध्ये येईल, असे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र चमत्कार घडविण्याची क्षमता भारतामध्ये आहे, असे ओल्टमन्स यांना वाटते. ‘‘शेवटच्या क्षणी गोल स्वीकारण्याऐवजी गोल करण्यावर भर देणे तसेच पूर्वी केलेल्या चुका टाळल्यास भारतीय संघ बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवू शकतो. भारतीय खेळाडूंनी तंदुरुस्तीसह हॉकी खेळातही बरीच मेहनत घेतली आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संघ उपांत्य फेरीत मजल मारेल, असे आताच सांगणे चुकीचे ठरेल. जर भारताने पहिले दोन सामने गमावले तर त्यांचे आव्हान लवकरच संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे भारताच्या कामगिरीबाबत कोणतेही अंदाज लावणे कठीण आहे.’’ भारताला ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड आणि मलेशिया या संघांचा सामना करावा लागणार आहे.